थोडा अधिकचा पैसा आला की बँकांच्या मुदत ठेवी (एफडी) हा सामान्य गुंतवणूकदारांसाठी सर्वात जवळचा पर्याय वाटतो. परंतु जोखीम संतुलित सर्वोत्तम परतावा, सहज रोकडसुलभता आणि मुख्य म्हणजे करमुक्त लाभ देणाऱ्या ‘डेट फंडां’सारख्या सरस पर्यायांकडे कानाडोळा आता तरी सोडून द्यायला हवा..
लोक आपल्या पैशाबाबत कितीही दक्ष व समंजस बनले असल्याचे म्हटले तरी, पैशाच्या गुंतवणुकीचा जेव्हा प्रश्न येतो तेव्हाच नेमकी त्यांच्याकडून गल्लत होताना दिसते. गुंतवणुकीवर परतावाही हवा, पण जोखीमही नको असे सनातन द्वंद्व गुंतवणुकदार वर्गापुढे कायम उभे असते आणि त्यातून मग चुका होतात. पर्याय आपल्यापुढे असतात, पण त्याबाबत आपण एक तर अनभिज्ञ तरी असतो अथवा माहित असूनही नवीन पर्याय स्वीकारण्यास आपण काही कारणाने कचरत असतो. जोखीम संतुलित सर्वोत्तम परतावा, सहज रोकडसुलभता (लिक्विडीटी) आणि मुख्य म्हणजे करमुक्त लाभही असा त्रिवेणी योग म्युच्युअल फंडाच्या स्थिर उत्पन्नाच्या (फिक्स्ड इन्कम फंड्स) योजनांतूनही दिला जातो. या योजनांना डेट फंड असे संबोधनही वापरात येते. विशेषत: सध्याच्या बाजार अनिश्चिततेच्या वातावरणात या योजना लोकप्रियही ठरल्या आहेत. आजच्या घडीला सर्व म्युच्युअल फंडांच्या एकत्रित गंगाजळीतील तब्बल ७२ टक्के हिस्सा हा डेट फंडांमध्ये गुंतलेला आहे, ही बाब पुरेशी बोलकी आहे.
बँकांच्या मुदत ठेवी (एफडी), सरकारी रोखे (जी-सेक), कंपन्यांच्या मुदत ठेवी अथवा डिबेंचर्स वगैरे गुंतवणूक पर्याय सुपरिचित आणि जनसामान्य त्यांच्याशी चांगलेच सरावलेले आणि ही मळलेली वाट सोडावीशीही काहींना वाटत नाही. पण एका वस्तुस्थितीबाबत हीच मंडळी मात्र अनभिज्ञ आहेत. स्थिर उत्पन्न योजनांमधून गुंतविला जाणारा पैसा हा याच सुरक्षित मानल्या गेलेल्या गुंतवणूक पर्यायांमध्येच जात असतो. एक नजर म्युच्युअल फंडांच्या स्थिर उत्पन्न योजनांच्या पोर्टफोलियो अर्थात गुंतवणूक भांडारावर (३० नोव्हेंबर २०१२ अखेर) टाकू या. या योजनांनी गोळा केलेल्या एकूण गंगाजळीतील १०% सरकारी रोखे (जी-सेक), जवळपास ५३% कंपन्यांच्या कर्जरोख्यांमध्ये तर जवळपास ३६% हे बँकांच्या मुदत ठेवींमध्ये गुंतविला गेला आहे. लक्षणीय बाब ही की, या फंडांकडून होणाऱ्या गुंतवणुकीला व्यावसायिक व तज्ज्ञ देखरेखीचे अंग असते. शिवाय अशी गुंतवणूक करण्यासाठी प्रत्येकाला कालावधी आणि जोखीमक्षमता यानुसार निवडीचे वैविध्य प्रदान केले जाते. एका परीने लिक्विड फंड, लिक्विड प्लस फंड, शॉर्ट टर्म इन्कम फंड, गिल्ट फंड आणि इन्कम फंड वगैरे सध्या उपलब्ध असलेल्या स्थिर उत्पन्न पर्यायांमधून मनाजोगती निवड करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य गुंतवणूकदाराला असते.
बँक एफडी, सरकारी रोखे हा आपला गुंतवणुकीचा पारंपरिक शिरस्ता मोडून या नव्या चटकदार पर्यायांकडे वळावे यासाठी वैविध्य हेच एकमेव कारण पुरेसे आहे काय? निश्चितच नाही आणि असे म्हणते तरी कोण? कोणत्याही फायद्याच्या गुंतवणुकीचे एक तत्त्व असते, त्या गुंतवणुकीला विविध कोनाने विविधांगी अंकुर फुटायला हवेत. अर्थात ‘डायव्हर्सिफिकेशन’ हाच गुंतवणुकीचा मूलमंत्र असून, वर दिलेल्या फंडांकडून तोच जपला जातो. नुसतेच वैविध्य नव्हे तर योग्य समयी योग्य त्या प्रमाणात पैसा तत्समयी सुयोग्य अशा रोख्यांमध्ये गुंतवून प्रत्येक वेळी सर्वोत्तम परतावा मिळवीत जाणे याच संकल्पनेवर डेट फंड पर्याय बेतलेले आहेत. अशा प्रकारचे त्या त्या वेळी घ्यावयाचे निर्णय हे आपण नव्हे तर तज्ज्ञ व कसबी गुंतवणूक व्यवस्थापकांकडून आपल्यासाठी घेतले जातात, हा फंडांना असलेला अधिकचा गुण होय.
थोडा अधिकचा पैसा आला की बँकांच्या मुदत ठेवी (एफडी) हा सामान्य गुंतवणूकदारांसाठी सर्वात जवळचा पर्याय वाटतो. पण भारतासारख्या विकसनशील अर्थव्यवस्थेचे एक लक्षण असे की, येथे अर्थकारणाचा चलनवाढ (महागाई दर) सतत पिच्छा पुरवीत असते. म्हणूनच मुदत ठेवींमधून एका ठरविक कालावधीत तुम्हाला निश्चित दराने परतावा मिळेल हे जरी खरे असले तरी त्या काळादरम्यान जर चलनवाढीच्या दराने गेले तीनेक वर्षे दिसते तसे रौद्ररूप धारण केले तर तुमच्या ठेवींमधून तुम्ही परतावा म्हणून जे काही कमवाल त्यातील जवळपास सर्व हिस्सा महागाई खाऊन टाकेल. त्या पैशाबाबत तुम्ही मनात मांडलेली सर्व गणिते कोलमडून पडतील. म्हणूनच महागाई दराला मात देणारा आपल्या गुंतवणुकीतून ‘अस्सल’ परतावा मिळविणे हे महत्त्वाचे असून डेट फंड नेमकी हीच महत्त्वपूर्ण भूमिका निभावताना दिसतात.
आता एफडी आणि स्थिर उत्पन्न योजनांच्या परताव्यांची आमने-सामने तुलनाच पाहू या. अशी तुलना बहुतांश वेळी एफडीच्या करांपूर्वीच्या विद्यमान परतावा दराशी, स्थिर उत्पन्न योजनांच्या गतकाळातील परताव्याशी होते. हे साफ चुकीचे आहे. तांत्रिकदृष्टय़ा अशी तुलना ही बँक एफडीचा कर वजा जाता येणारा परतावा आणि या ठेवी ज्या काळातील आहेत त्याच काळातील डेट फंडांच्या परताव्याच्या कामगिरीशी व्हायला हवी. सफरचंदाची तुलना ही सफरचंदाशीच व्हायला हवी, टरबूजाशी नव्हे. अशी तुलना झाली तरच मग परताव्यात सर्वश्रेष्ठ कोण हे धुतळ्या तांदळासारखे स्पष्ट होईल.
या शिवाय स्थिर उत्पन्न योजनांचा आणखी एक न दुर्लक्षिता येणारा गुणविशेष हा की, बँकांमधील एफडींपेक्षा त्या रोकडसुलभ आहेत, म्हणजे इच्छा असेल तेव्हा ही गुंतवणूक मोडून पैसा परत मिळविता येतो. एफडी मुदतीपूर्वीच मोडता येतात हे खरे पण तसे केल्यास एक तर एक तर व्याज काहीच मिळत नाही अथवा मिळालेल्या व्याज परताव्याला दंडाची कात्री लागते. त्या उलट डेट फंडातील गुंतवणूक मोडाल त्या दिवसांपर्यंत जमा परताव्यावर तुमचा पूर्ण हक्क असेल व तो संपूर्णपणे तुम्हाला मिळविता येईल.
डेट फंडांचे हे विविध पर्याय आणि त्यांचे विशेष गुण असले तरी त्यांचा फायदा हा काही बडय़ा संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून घेतला जातो, सामान्य गुंतवणूकदार अशा योजनांपासून अजूनही दूर आहेत हे दुर्दैवाने खरे आहे. अशा गुंतवणूक पर्यायांपासून अंतर राखण्याचे कारण काहीजण या फंडांकडून आकारले जाणारे शुल्क हे असल्याचे उत्तर देतात. पण आपल्या चुकीच्या गुंतवणूक वर्तनाचे ते करीत असलेले असे समर्थन समर्पक आहे काय? आपल्याला परंपरेने मिळालेला आजीबाईचा बटवा हा अनुभवसिद्ध वारसा आपल्यापाशी असताना, कुटुंबात छोटय़ा ताप-सर्दीसाठीही डॉक्टरकडे जाऊन त्यांची फी जर भरत असू तर या फायद्याच्या व्यावसायिक वित्तीय सेवेसाठी काही शुल्क भरताना नाके का मुरडली जावीत? आपल्या पैशाचा अतीव काळजीने सांभाळ करीत, त्या पैशातून तुम्हाला वेळोवेळी सर्वोत्तम परतावा मिळावा यासाठी तो योग्य दिशेने वळविण्याचे काम करणाऱ्या तज्ज्ञ सेवेचे नाममात्र मोल खरे तर जड न ठरावे. गमंत म्हणजे तुम्ही एफडी म्हणून गुंतविलेला पैसा बँका-कॉर्पोरेट्स अशा स्थिर उत्पन्न योजनांत गुंतवून त्यातून कमावलेल्या उत्पन्नाचा काही हिस्सा तुम्हाला परतावा म्हणून देत असतात, मग तुम्हीच थेट अशा स्थिर उत्पन्न योजनात पैसा गुंतविणारा स्मार्ट निर्णय घेण्यात कचरण्याचे कारण काय?
(प्रस्तुत लेखक हे बिर्ला सन लाइफ अॅसेट मॅनेजमेंट कंपनीचे मुख्य गुंतवणूक अधिकारी आहेत)
पैशाची गोष्ट.. : फिरूनि पुन्हा डेट फंडांकडे!
थोडा अधिकचा पैसा आला की बँकांच्या मुदत ठेवी (एफडी) हा सामान्य गुंतवणूकदारांसाठी सर्वात जवळचा पर्याय वाटतो. परंतु जोखीम संतुलित सर्वोत्तम परतावा, सहज रोकडसुलभता आणि मुख्य म्हणजे करमुक्त लाभ देणाऱ्या ‘डेट फंडां’सारख्या सरस पर्यायांकडे कानाडोळा आता तरी सोडून द्यायला हवा..
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 19-02-2013 at 12:10 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Money story date fund benefits