प्रारंभिक मान्सूनची प्रगती ही भारताच्या शेती आणि एकूण अर्थव्यवस्थेसाठी निश्चित शुभसंकेत देणारी असून, देशाच्या अर्थव्यवस्थेला कणखर पायावर वाटचालीस ही बाब हातभार लावणारी ठरेल, असे प्रतिपादन अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केले.
अमेरिकेतील दौऱ्या अंतर्गत जेटली यांनी सीआयआयने तेथील अमेरिका-भारत व्यापार परिषद (यूएसआयबीसी)सह आयोजित केलेल्या स्वागत सोहळ्यात सोमवारी भारतातील पावसाच्या ताज्या सुधारीत अनुमानाबाबत समाधानाचे भाव व्यक्त केले. अर्थव्यवस्थेसाठी ही मोठी दिलासादायी बाब असल्याचे त्यांनी सांगितले.
संथ सुरुवातीनंतर नैऋत्य मोसमी पावसाने देशभरात दमदार हजेरी लावली असून, भारतीय हवामान खात्यानेही नव्याने सुधारलेला अंदाज व्यक्त केला आहे. महिन्याच्या प्रारंभी मात्र दीर्घकालीन सरासरीपेक्षा तुटीचा पाऊस होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता.
अर्थमंत्र्याबरोबर बैठकीसाठी उद्योगक्षेत्रातील उपस्थितांमध्ये मायक्रोसॉफ्ट, अप्लाइड मिनरल्स, अॅमेझॉन, ओरॅकल, ह्य़ुलेट पॅकार्ड, व्हिसा, फ्रँकलिन टेम्पल्टन, गुगल, सिस्को, फर्स्ट सोलर, ईबे, क्वालकॉम, ब्लॅकबेरी आणि सॅनडिस्क या जागतिक कंपन्यांच्या प्रतिनिधींचा समावेश होता, असे आयोजकांना प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
भारतातील सुधारलेल्या आर्थिक आणि गुंतवणूकविषयक परिस्थितीची विस्तृत मांडणी जेटली यांनी या कंपन्यांपुढे केली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा