नवी दिल्ली : जागतिक अर्थव्यवस्थेसमोरील वाढती आव्हाने, उच्च चलनवाढ आणि कठोर पतधोरण या बाह्य प्रतिकूलतेतून भारताची अर्थव्यवस्था रुळावरून घसरण्याची शक्यता दिसून येत नाही, असा निर्वाळा मूडीज इन्व्हेस्टर्स सव्र्हिसने मंगळवारी देशाच्या पतमानांकनाविषयक स्थिर दृष्टिकोन कायम राखत दिला.
मूडीजने ३१ मार्च २०२२ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षांतील सकल राष्ट्रीय उत्पादनांतील (जीडीपी) ८.७ टक्क्यांच्या वाढीच्या तुलनेत चालू आर्थिक वर्षांत भारतीय अर्थव्यवस्था तुलनेने कमी ७.६ टक्क्यांनी वाढू शकेल, असे भाकीत केले. त्यानंतरच्या २०२३-२४ साठी, तिने ६.३ टक्के दराने जीडीपी वाढण्याचे अंदाजले आहे. मूडीजने भारताचे सर्वात तळच्या गुंतवणूक श्रेणीचे अर्थात ‘बीएए३’ हे मानांकन अपरिवर्तित ठेवले आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये, मात्र तिने दृष्टिकोन ‘नकारात्मक’वरून ‘स्थिर’ असा बदल केला आहे. ‘देशांतर्गत स्थिर वित्तपुरवठय़ाचे सरकारला पाठबळ असलेली आणि उच्च वाढीची क्षमता असलेली मोठी आणि वैविध्यपूर्ण अर्थव्यवस्था’ हे भारताचे सामर्थ्य प्रतििबबित करते, असे मूडीजने म्हटले आहे.