मोदी सरकारचे ‘अच्छे दिन’ प्रत्यक्षात दिसत नसल्याची तक्रार सामान्यांपासून उद्योजकांपर्यंत सारे करत असताना ‘मूडी’ व ‘फिच’ या आघाडीच्या पतमानांकन संस्थांनी मात्र भारताच्या आगामी अर्थप्रगतीवर विश्वास दर्शविला आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या अर्थ सुधारणा येत्या काही दिवसांमध्ये प्रत्यक्षात दिसल्यानंतर वर्ष-दीड वर्षांच्या कालावधीत देशाचे पतमानांकन सध्याच्या ‘स्थिर’वरून ‘सकारात्मक’ केले जाईल, असे संकेत ‘मूडी’ने दिले. तर ‘फिच’ने भारताचे मानांकन कमी न करता, बीबीबी – असे तूर्तास स्थिर ठेवण्याबाबत सहमती दर्शविली आहे.
अमेरिकास्थित मूडीजने भारताला दिलेले मानांकन सध्या ‘बीएए३’ दर्जाचे आहे. गुंतवणूकविषयक ते कमी स्तरावरचे आहे. फारसे ते धोकादायक नसले तरी संस्थेने नुकताच स्थिर मानाचा दर्जा देशाला बहाल केला होता. केंद्रात पूर्ण बहुमताने सत्तेवर आल्यानंतर सरकारचा पहिला परिपूर्ण अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी मानांकन उंचावण्यासाठी खुद्द अर्थमंत्र्यांपासून प्रयत्न केले जात होते.
भारताबाबत आशावादी राहण्याचे सुचवितानाच मूडीजचे विश्लेषक अत्सी शेट यांनी देशाचे पतमानांकन सध्याच्या ‘बीएए३’वरून येत्या १२ ते १८ महिन्यांत अधिक वाढू शकते, असे म्हटले आहे. २००४ पासून पतमानांकन संस्थेने दिलेला स्थिरतेचा दर्जा कायम आहे.
स्थिर दर्जा राखण्याबाबत सहमती दर्शवितानाच फिचने देशाचा विकास दर चालू आर्थिक वर्षांसाठी ८ टक्के अभिप्रेत केला आहे. रिझव्र्ह बँकेच्या ७.८ टक्क्यांपेक्षा तो निश्चितच अधिक आहे. वित्तीय धोरणावर सरकारकडून प्रगती झाल्यास पतमानांकन उंचावण्याचे संकेत फिचनेही दिले आहेत.
फिचमार्फत दिले गेलेले स्थिर पतमानांकन २०१३ पासून कायम आहे. निश्चित कालावधी न देता यंदा ते वाढू शकते, असेही नमूद करण्यात आले आहे.
अमेरिकेच्याच ‘स्टॅण्डर्ड अॅण्ड पुअर्स’ने नुकतेच भारताचे पतमानांकन स्थिर असे आधीच्या स्तरावरून उंचावले होते.
मूडीच्या पतमानांकन उंचावण्याच्या तयारीमुळे निश्चितच आनंद झाला आहे. मात्र सरकारसाठी करण्यासारखे आणखी बरेच काही आहे. आंतरराष्ट्रीय पतमानांकन संस्थेने देशाच्या अर्थव्यवस्थेचे पतमानांकन स्थिरतेकडून सकारात्मक दिशेने नेण्याचे संकेत दिले आहेत. आर्थिक स्थिती सुधाराचे हे लक्षणच आहे, असे म्हणायला हरकत नाही.
-अरुण जेटली, अर्थमंत्री
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा