फेडकडून सुलभ पतधोरणाची अपेक्षा
यंदा मान्सून चांगला राहिला आणि पर्यायाने महागाई कमी झाली तर नजीकच्या भविष्यात आणखी व्याजदर कपात करता येईल, अशी ग्वाही रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांनी शुक्रवारी येथे दिली.
राजन सध्या केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याबरोबर अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. डॉ. राजन यांनी शुक्रवारी भारताच्या अर्थमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत अमेरिकी फेडरल रिझव्‍‌र्हच्या गव्हर्नर जेनेट येलन यांच्याशी चर्चा केली. राजन यांच्या दौऱ्यादरम्यान अमेरिकेचे व्यापार मंत्री जेकब लू, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी तसेच जागतिक बँकेचे प्रतिनिधीही उपस्थित आहेत.
यानिमित्ताने येथे एका कार्यक्रमादरम्यान ते म्हणाले की, यंदा मान्सून चांगला राहण्याचा अंदाज वेधशाळेने व्यक्त केलाच आहे. मात्र आम्ही महागाईच्या आगामी आकडय़ांवर नजर ठेवून आहोत. सध्या त्यात दिलासा मिळत असला तरी त्यात सातत्य आवश्यक आहे. ते आगामी कालावधीत दिसून आल्यास रिझव्‍‌र्ह बँकेला व्याजदर कपातीस वाव असल्याचेही ते म्हणाले.
उद्योग, कंपन्यांना यंदा किमान अध्र्या टक्क्य़ाच्या दर कपातीची अपेक्षा होता. मार्चमधील महागाई दर ५ टक्क्य़ांच्या खाली विसावला आहे. त्याचबरोबर फेब्रुवारीतील औद्योगिक उत्पादन दरही २ टक्क्य़ांपर्यंत उंचावला आहे.
अमेरिकेच्या फेडरल रिझव्‍‌र्हच्या अध्यक्षा त्यांची पतधोरणे ही भारतासारख्या विकसनशील देशांना समोर ठेवून राबवतील, असा विश्वासही राजन यांनी व्यक्त केला. अमेरिकेची पतधोरणे ही चीनसारख्या विकसनशील देशांवर आघात करणारी आहेत, अशी टीका होत होती.
फेडरल रिझव्‍‌र्हचे पतधोरणही विकसनशील देशांतील चलन अस्थिरता, वायदा वस्तूंच्या घसरत्या किमती यावर अधिक लक्ष देणारे तयार होत असल्याचेही राजन म्हणाले. फेडरल रिझव्‍‌र्हचे व्याजदर वाढविण्याबाबतचे सध्याचे नरमाईचे धोरण इतर देशांकरिता साहाय्यभूत ठरणारे आहे, असे राजन म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा