जिओजित बीएनपी परिबाचा दावा
नव्या पिढीच्या गुंतवणूकदारांचा डिजिटल माध्यमांकडील ओढा पाहता, गुंतवणुकीच्या व्यासपीठाची आधुनिकता त्याला आकर्षित करणारा महत्त्वाचा घटक ठरत आहे आणि म्हणूनच तंत्रज्ञानात्मक नावीन्यतेची नवनवीन दालने खुली करण्याचा जिओजित बीएनपी परिबा निरंतर प्रयत्न करीत राहील, अशी ग्वाही तिचे संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक सी. जे. जॉर्ज यांनी दिली.
आघाडीच्या वित्तीय सेवा कंपनीने सर्वप्रथम फेब्रुवारी २००० मध्ये इंटरनेटद्वारे समभाग उलाढालीचे व्यवहाराचा मंच खुला केला. २००८ पर्यंत दलाली पेढीच्या एकूण उलाढालीचे ५ टक्के व्यवहार हे या मंचाद्वारे सुरू होते. तेच प्रमाण एकूण उलाढालीच्या निम्म्याहून अधिक, ५५ टक्क्यांवर पोहोचले आहे. २००८ पासून सुरू झालेल्या मोबाइल ट्रेडिंग सुविधेतूनच एकूण उलाढालीचे २० टक्के – दैनंदिन सरासरी १,५०० कोटींच्या उलाढाली होत असल्याचे जॉर्ज यांनी सांगितले. जिओजित बीएनपी परिबाने गुंतवणूकदारांना अगदी अनोख्या ट्रेडिंगची अनुभूती देणारे ‘सेल्फी’ नावाचे नवीन गुंतवणूक व्यासपीठ बुधवारी प्रस्तुत केले. समभाग, म्युच्युअल फंड, डेरिव्हेटिव्हज वगैरे वस्तू वायदे बाजार वगळता सर्व प्रकारच्या गुंतवणुकांसाठी उलाढालीच्या या व्यासपीठाच्या वेब व टॅब्लेट आवृत्तीचे अनावरण प्रख्यात गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांच्या हस्ते करण्यात आले. कोणत्याही उपकरणावर तसेच संगणक कार्यप्रणालीवर, कोणत्याही ब्राऊझरद्वारे ‘सेल्फी’चा शक्य होणारा वापर ही भांडवली बाजारात स्वयंप्रेरणेने व्यवहार करणाऱ्या नवगुंतवणूकदारांसाठी पर्वणीच ठरेल, असा अभिप्राय झुनझुनवाला यांनी व्यक्त केला. संशोधन अहवाल, कंपनीविषयी बातम्या, तांत्रिक विश्लेषणास मदतकारक आलेख, ९० हून अधिक तांत्रिक संकेतांची सेल्फीवरील उपलब्धता हे गुंतवणूकदारांना निर्णय घेण्यास साहाय्यक ठरतील.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा