राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूर शहरातील विविध प्रकल्पांसाठी भरीव तरतूद करण्यात आली असली, तरी विदर्भातील अन्य जिल्ह्यांची मात्र उपेक्षाच करण्यात आल्याचे चित्र यंदाच्या अर्थसंकल्पात दिसून येते. अर्थसंकल्पात नागपूरमधील मिहान प्रकल्पासाठी दोनशे कोटी, मेट्रो प्रकल्पाला गती तसेच रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून उन्नत मेट्रो प्रकल्प, हजरतबाबा ताजुद्दीन यांच्या दग्र्यासाठी २० कोटी, वर्धा येथील सेवाग्राम आश्रमासाठी ३० कोटी अशा महत्त्वाच्या तरतुदी करण्यात आल्या असून या तुलनेत अन्य जिल्ह्यांना मात्र फारसा निधी मिळालेला नाही.
आज जाहीर झालेल्या अर्थसंकल्पात विदर्भातील मिहान प्रकल्पाला अधिक गती देण्यासाठी आणखी २०० कोटींची तरतूद करण्यात आली असून त्यातून उद्योगांना चालना मिळेल, असा विश्वास अर्थमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे. विशेष आर्थिक क्षेत्रासारख्या या मिहान प्रकल्पात इन्फोसिस, बोइंग अशा बडय़ा कंपन्यांनी आपले उद्योग सुरू केले आहेत. त्याशिवाय विदर्भात तब्बल २३० टेक्स्टाइलचे प्रकल्प चालू करण्याचाही विचार सरकार करत आहे. कापूस उत्पादनाच्या बाबतीत आघाडीवर असलेल्या विदर्भात हे प्रकल्प सुरू झाल्यास रोजगार आणि आर्थिकदृष्टय़ा प्रगती होणार आहे.
मिहान प्रकल्पाचा आणि नागपूरमधील सिताबर्डी-विमानतळ-बुटीबोरी या पहिल्या उन्नत मेट्रो प्रकल्पाचा अपवाद वगळता यंदा विकासकामांच्या नावाखाली विदर्भाच्या वाटय़ाला फारसे काही आलेले नाही. सिताबर्डी-विमानतळ-बुटीबोरी या पहिल्यावहिल्या उन्नत रेल्वे मेट्रो प्रकल्पासाठी राज्य शासनाने तत्त्वत: मंजुरी दिली आहे. या प्रकल्पासाठी कार्यान्वयीन यंत्रणा म्हणून नागपूर सुधार प्रन्यासाची नियुक्ती करण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी सात हजार ३५० कोटी रुपये एवढा खर्च अंदाजित आहे. या प्रकल्पाचा प्रस्ताव राज्य सरकारने शिफारशीसह केंद्राकडे पाठवण्यात येणार आहे.
यंदाच्या अर्थसंकल्पात तीर्थक्षेत्रांसाठीचा निधी एक कोटीवरून दोन कोटी करणाऱ्या अर्थमंत्र्यांनी नागपूरमधील हजरतबाबा ताजुद्दीन यांच्या दग्र्यासाठीही विशेष तरतूद केली आहे. ताज-बाग येथील हा दर्गा देशविदेशातील भाविकांचे श्रद्धास्थान आहे. या परिसराचा विकास करण्यासाठी ताजबाग विकास आराखडा तयार करण्यात येत असून अर्थसंकल्पात २० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
महात्मा गांधी यांच्या वास्तव्याने ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झालेल्या वर्धा येथील सेवाग्राम आश्रमाच्या विकासासाठीही राज्य सरकारने यंदाच्या अर्थसंकल्पात निधी मंजूर केला आहे. सेवाग्राम आश्रम आणि वर्धा शहर यांच्या विकासासाठी राज्य सरकारने येत्या आर्थिक वर्षांत ३० कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे.या ठोस तरतुदींशिवाय राजीव गांधी सबल योजनेत विदर्भातील अमरावती जिल्ह्याचा समावेश करण्यात आले आहेत. या योजनेत राज्यातील अकरा जिल्ह्यांचा समावेश असून त्यासाठी राज्याने ११० कोटी ७८ लाख रुपये मंजूर केले आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा