सौर-पवन संकरित प्रकल्पासाठी टीपी शौर्यला देकार

मुंबई : राज्यात ३०० मेगावॅट स्थापित क्षमतेच्या पवन आणि सौर संकरित वीजनिर्मिती प्रकल्प उभारण्यासाठी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीकडून (महावितरण) देकार मिळाल्याचे टाटा पॉवरने गुरुवारी स्पष्ट केले.

राज्यातील धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा येथे हा प्रकल्प साकारला जाणार असून, हरित ऊर्जा सक्षमतेच्या दिशेने पडलेले हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. टाटा पॉवरची पूर्ण मालकीची उपकंपनी असलेल्या टीपी शौर्य लिमिटेडने महावितरणच्या निविदा प्रक्रियेत स्पर्धात्मक आधारावर हा देकार (एलओए) मिळविला असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

विजेच्या दरावर आधारित स्पर्धात्मक बोलीद्वारे हा प्रकल्प ‘ई-रिव्हर्स’ लिलावाद्वारे टीपी शौर्यने मिळविला आहे. प्रकल्पातून निर्मित विजेसाठी महावितरणबरोबर वीज खरेदी करार झाल्यानंतर, १८ महिन्यांच्या आत प्रकल्पाचे कार्यान्वयन म्हणजे प्रत्यक्ष वीजनिर्मिती सुरू होणे अपेक्षित आहे.

इतक्या मोठ्या क्षमतेचा संकरित (पवन आणि सौर) वीज निर्मितीचा प्रकल्प पटकावला जाणे ही टाटा पॉवरसाठी अभिमानाची गोष्ट आहे, असे नमूद करून टाटा पॉवरचे मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय संचालक प्रबीर सिन्हा यांनी या प्रकल्पामुळे कंपनीच्या एकूण स्थापित क्षमतेत अक्षय्य ऊर्जेचा वाटा आणखी वाढेल, असा विश्वास व्यक्त केला.

महाराष्ट्रातील या प्रकल्पामुळे देशातील इतर राज्यांनाही स्वच्छ विजेचे युग सुरू करण्यासाठी हरित ऊर्जेच्या पर्यायांकडे वळण घेण्यासाठी चालना मिळेल, असा आशावादही सिन्हा यांनी व्यक्त केला.

या नवीन प्रकल्पामुळे टाटा पॉवरची एकूण अक्षय्य ऊर्जा क्षमता ४,९०७ मेगावॅटवर जाईल. ज्या अंतर्गत २,९५३ मेगावॅटची स्थापित क्षमता आणि १,९५४ मेगावॅट ही सध्या काम सुरू असलेली क्षमता आहे. शिवाय, औष्णिक व जलविद्युत त्याचप्रमाणे पवन व सौर अशा वीज निर्मितीच्या सर्व मूल्य साखळीत अस्तित्व असणारी ती एकंदर १३,०६८ मेगावॅट स्थापित क्षमतेसह आघाडीची एकात्मिक कंपनी म्हणून स्थान बळकट करेल.

Story img Loader