रिलायन्स इंडस्ट्रीजचे मुख्य प्रवर्तक व अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी सलग सहाव्या वर्षी १५ कोटी रुपये वार्षिक वेतन घेण्याचा क्रम राखला आहे. फोर्बसच्या यादीत नेहमीच आघाडीचा क्रम राखणारे अंबानी हे देशातील निवडक श्रीमंत व्यक्तींमध्ये गणले जातात. ते २००८-०९ पासून वार्षिक १५ कोटी वेतन घेत आहेत. ३१ मार्च २०१४ च्या कंपनीच्या वार्षिक अहवालातही अंबानी यांना १५ कोटी रुपये वेतन म्हणून देण्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. यामध्ये ४.१६ कोटी रुपये हे वेतन, तर ६० लाख रुपये भत्ता, निवृत्तीलाभ म्हणून ८२ लाख व ९.४२ कोटी रुपये नफ्यावरील लाभ म्हणून धरले आहेत. अंबानी यांची पाच वर्षांपूर्वीची मिळकत २४ कोटी, तर यंदाही भागधारकांनी ३८.८६ कोटी रुपयांच्या वेतनास मंजुरी दिली होती. मात्र मुख्याधिकाऱ्यांच्या वाढत्या वेतनाच्या चर्चेनंतर अंबानी यांनी ऑक्टोबर २००९ पासून १५ कोटी रुपयांचे बंधन घालून घेतले. कंपनीच्या तेल व वायू विभागाचे प्रमुख पी. एम. एस. प्रसाद यांचे वेतन ६.०३ कोटी रुपयांवर, तर शुद्धीकरण विभागाचे प्रमुख पवन कुमार कपिल यांचे २.४९ कोटी रुपयांपर्यंत वाढले आहे.

Story img Loader