माध्यम क्षेत्रात विविध दूरचित्रवाहिन्यांची साखळी चालविणाऱ्या नेटवर्क१८ समूहावर प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचे वर्चस्व स्थापन झाले आहे. भारतीय मनोरंजन वाहिन्यांसह वृत्त वाहिन्यांवरही यामार्फत रिलायन्सचे अस्तित्व विस्तारले आहे. टीव्ही१८ समूहात गेल्या काही दिवसांपासून वरिष्ठ अधिकाऱ्यांचे राजीनामा सत्र याच पाश्र्वभूमीवर सुरू होते.
माध्यम क्षेत्रात काही महिन्यांपूर्वी सावकाश प्रवेश करणाऱ्या अंबानी यांच्या माध्यमातून भारतीय माध्यम क्षेत्रातील सर्वात मोठा आर्थिक व्यवहार होत आहे. अंबानी यांनी ईटीव्ही वाहिन्या खरेदी करत जानेवारी २०१२ पासून समूहात रस दाखविला होता.
नेटवर्क१८ मधील तब्बल ७८ टक्क्यांसह टीव्ही१८ मध्ये ९ टक्के हिस्सा मिळविण्यास रिलायन्स इंडस्ट्रीजच्या संचालक मंडळाने गुरुवारी मंजुरी दिली. इंडिपेन्डेन्ट मीडिया ट्रस्टला ४००० कोटी रुपये निधी देण्याच्या रिलायन्सच्या प्रस्तावाद्वारे अंबानी यांना या वाहिन्यांमधील हिस्सा खरेदी करता येणार आहे.
नेटवर्क१८ मीडिया अ‍ॅण्ड इन्व्हेस्टमेन्ट लिमिटेड आणि तिची उपकंपनी टीव्ही१८ ब्रॉडकास्ट लिमिटेडवर ताबा मिळविण्यासाठी रिलायन्सला या निधीचा उपयोग होईल. टीव्ही१८ समूहामार्फत विविध संकेतस्थळे (ई-कॉमर्स, अर्थवृत्त, भाषिक वृत्त), मनोरंजन व वृत्त दूरचित्रवाहिन्या (कलर्स, सीएनएन, आयबीएन, सीएनबीसी टीव्ही१८, आयबीएन७, सीएनबीसी आवाज) चालविल्या जातात.

वरिष्ठ अधिकाऱ्यांचे राजीनामा सत्र
टीव्ही१८ समूहात गेल्या काही दिवसांपासून वरिष्ठ अधिकाऱ्यांचे राजीनामा सत्र सुरू आहे. नेटवर्क१८ मीडिया अ‍ॅण्ड इन्व्हेस्टमेन्ट लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी. साई कुमार यांनी तसेच मुख्याधिकारी अजय चाको यांनी याच आठवडय़ात राजीनामा दिला आहे. मुख्य वित्तीय अधिकारी रमणदीप सिंग बावा यांनीही रिलायन्सकडून हिस्सा वाढीचे वृत्त येण्याच्या बरोबरीनेच गुरुवारी सायंकाळी आपले राजीनामापत्र दिल्याचे स्पष्ट होते. नेटवर्क१८ ही कंपनी मुंबई शेअर बाजारात सूचिबद्ध आहे.

Story img Loader