सध्याच्या बाजारातील वातावरणाला नैराश्याने ग्रासले आहे. निर्देशांकातील जराशी वाढही बाजाराला पचविणे जिकीरीचे बनले आहे. संधी मिळेल तेव्हा आपला माल विकण्याची प्रवृत्ती वाढीला लागणे आणि विशेषत: देशी फंड, वित्तसंस्था आणि त्यांचे अनुकरण करीत सामान्य गुंतवणूकदारांनीही बाजारातून पळ काढणे हे पेचात टाकणारेच आहे. ३० जानेवारी २०१३ रोजी २०,००५ या सेन्सेक्सच्या उच्चांक स्तरापासून गेले काही दिवस सुरू असलेला हा प्रघात आहे. आजवर एकांगी खरेदीचा भर असलेल्या विदेशी संस्थागत गुंतवणूकदार (एफआयआय)ही सध्या खरेदी-विक्रीचे वेगवेगळे डाव मांडून या खेळात सहभागी झाले आहेत. त्यांची एकीकडे खरेदी सुरू आहे असे म्हणायचे, तर त्यांनीच लावलेल्या विक्रीच्या सपाटय़ाने अनेक विशेषत: मिड-कॅप धाटणीच्या समभागांचा बाजारात अक्षरश: पाळापाचोळा झाला आहे. स्थावर मालमत्ता क्षेत्रातील अनेक समभागांना निरंतर मंदीचे खालचे सर्किट लागत आहे. दूरसंचार क्षेत्रातील समभाग, आयटी समभाग आणि सरकारी क्षेत्रातील बँकांच्या समभागांबाबतही काही प्रमाणात असाच क्रम सुरू आहे. सध्या सीमेंट आणि साखर क्षेत्रातील समभागांमध्ये हालचाल सुरू आहे. साखरेबाबत काही तरी गोड बातमी येणार या वदंतेने या समभागांमधील वध-घट खूपच वाढली आहे.
देशातून फंड, वित्तसंस्थांच्या गुंतवणुकीचे चित्र कमालीचे नीरस आणि एफआयआयच्या अगदी विरूद्धार्थी टोक गाठणारे बहुतांश राहिले आहे. जी काही बडी गुंतवणूक झाली ती आयुर्विमा महामंडळ अर्थात एलआयसीकडून. डिसेंबर २०१२ अखेरच्या अहवालानुसार, एलआयसीने सर्वात जास्त गुंतवणूक ही निफ्टी निर्देशांकांतील समभागांमध्ये केली आणि प्रसंगी नफाही कमावून घेतला.
सद्य प्रवाहाला छेद देणारे काही मोजके समभाग म्हणजे सन फार्मा, टाटा कन्सल्टन्सी सव्‍‌र्हिसेस, आयएनजी वैश्य बँक, मदरसन सुमी सिस्टिम्स, इंडसइंड बँक वगैरेंचा आवर्जून उल्लेख करावा लागेल आणि या प्रत्येकाबाबतीत तशी ठोस कारणेही आहेत. या सदरात मागे सुचविलेला एशियन पेंट्सची यात गणना करावी लागेल.
सध्याचा पार थकला-भागलेला बाजार तेजीला रेटू शकण्याच्या स्थितीत अजिबात दिसत नाही. विद्यमान स्थितीला तेजीचा नव्याने प्रवाह घेऊन येणाऱ्या मुसंडीसाठी काही काळ दम घेण्याचा आहे असेही निश्चितपणे म्हणता येणार नाही. त्यामुळे नुसते तात्पुरते करेक्शन असल्याचेही ठामपणे सांगता येणार नाही. एकंदर अस्थिर बनलेल्या बाजारस्थितीत नवीन खरेदीचा विचारही नको. अर्थसंकल्प येऊ घातला आहे, तो कसा आहे आणि त्यावर बाजाराची प्रतिक्रिया काय हे तूर्तास सबुरीने पाहा, असेच आता सुचविता येईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा