सहामाहीत प्रकल्प विक्रीत २३ टक्के वाढ

मुंबई शहर, उपनगर व एकूणच महानगर प्राधिकरण क्षेत्रात स्थावर मालमत्ता क्षेत्राने गेल्या दोन वर्षांत प्रथमच उभारी घेतली असून नव्या प्रकल्पांचे सादरीकरण २९ टक्क्य़ांनी वाढले आहे. तर विक्रीतील वाढ २३ टक्के वाढ नोंदली गेली आहे.
जानेवारी ते जून या २०१६ च्या पहिल्या सहामाहीतील मुंबईच्या स्थावर मालमत्ता क्षेत्राचा प्रवास ‘नाईट फ्रँक’ने नुकताच ताज्या अहवालाद्वारे प्रस्तुत केला. ‘भारतीय स्थावर मालमत्ता’ नावाच्या प्रमुख सहामाही अहवालाच्या पाचव्या आवृत्तीत गेल्या दोन वर्षांत न विकल्या गेलेल्या जागांमध्ये २० टक्क्यांनी घसरण नोंदली गेल्याचे नमूद करण्यात आले आहे.
मध्यम, परवडणाऱ्या दरातील घरनिर्मिती क्षेत्राला मागणी वाढल्याचे हा अहवाल सांगतो. उच्चभ्रू घरांच्या बाजारपेठेतील तेजीला अद्याही अवकाश असल्याचे यात नमूद करण्यात आले. महानगर प्राधिकरण क्षेत्रात घरांच्या किंमतीत सुधारणेला वाव असल्याचेही अहवालात अधोरेखित करण्यात आले आहे.
मुंबईनजीकच्या ठाणे, नवी मुंबई लहान बाजारपेठेत सातत्याने विकास होत असल्याचे निरिक्षण नोंदविण्यात आले आहे. ठाणे आणि पश्चिम उपनगरांमध्ये अनुक्रमे ४७ आणि २९ टक्के वाढ नोंदली गेली आहे. नवी मुंबई, मध्य आणि पश्चिम उपनगरांमध्ये अनुक्रमे २८ ,९ आणि २१ टक्क्यांची वाढ घरविक्रीत नोंदली गेली आहे.
अहवालात कार्यालयीन जागेवर प्रकाश टाकताना शहरातील कार्यालयीन जागांना पूर्वीसारखीच मागणी आणि अधिक जागा संपादन तसेच माहिती तंत्रज्ञान व संबंधित क्षेत्रे आणि उत्पादन क्षेत्रांकडून आलेल्या मागणीमुळे विकास झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.