..२८ मजली टॉवर, संगणकीकृत व्यवहार असे हे दिमाखदार बीएसई म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज सुमारे ५० वर्षांपूर्वी होते तरी कसे असे कुतुहल अनेकांना असते त्यांच्यासाठी हा खास लेख..
४, ५, ६, ७!! अर्थात ४ मे १९६७. नोकरीच्या निमित्ताने या दिवशी मी प्रथमत: पाऊल ठेवले बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या संकुलात. अर्थात हे संकुल म्हणजे आताची २८ मजल्याची जीजीभॉय टॉवर नव्हे. तेव्हा या टॉवरच्या जागी होती एकमजली चाळवजा जुनाट इमारत. लाकडी फळय़ांची जमीन असलेली. दलाल स्ट्रीटवरून प्रवेश असलेली ही इमारत. पायथ्याशी आता असलेले वडाचे झाड मात्र तेव्हापासूनचे. शिवाय प्रवेश करताक्षणीच असलेले छोटेखानी  चहाचे हॉटेल. हॉटेल कसले, जरा सुधारीत टपरीच जणू. इथला ‘मसाला चाय’ मात्र फर्मास. आसपासच्या इमारतीतीलच नव्हे तर दूरवरून ऑफिस बाबू मंडळी या मसाला चायची लज्जत चाखायला इथे यायची. स्टॉक एक्सचेंजचा महत्वाचा विभाग म्हणजे क्लीअिरग हाऊस याच इमारतीत होते पहिल्या मजल्यावर. मात्र तेव्हा शेअर्स सर्टिफिकेट स्वरूपात असल्याने सर्टिफिकेट्स सांभाळून ठेवण्यासाठी तीन मोठय़ा गोदरेजच्या तिजोऱ्या होत्या त्या तळमजल्यावर. बहुधा त्या खास ऑर्डर देऊन बनवून घेतलेल्या असाव्यात. दरवाजा उघडायला दोन माणसांनी तो खेचावा लागे इतका जड. याच इमारतीत एक मोठा हॉल होता जिथे अक्षरश: टेबल टाकून दलाल मंडळींची ‘कार्यालये’ असत. मोठे टेबल किंवा दोन मोठी टेबले असा हा चौरस फुटांचा हिशेब! नाही दार नाही भिंती. या अजब कार्यालयातून लाखोंचा व्यवहार चालायचा. जणू काही ही आताच्या परिभाषेत फ्रंट ऑफिसेस! याच ठिकाणी आता उभी असलेली इमारत म्हणजे २८ मजली फिरोज जीजीभॉय टॉवर्स! त्याच्या बाजूला तळमजल्यावर मोकळय़ा जागेत होती ती ट्रेडिंग रिंग! पूर्णत: मोकळी. तिथे शेअर विकणारे आणि विकत घेणारे दलाल – अर्थात दलालांची नोकर मंडळी – मोठमोठय़ा आवाजात ओरडून सौदे करायची. ती आरडाओरडी कौतुकाने ऐकायला लंच टाइममध्ये फोर्ट परिसरातील मंडळी कुतुहलाने येत असत. त्याला लागूनच एक पाच मजली इमारत होती ज्याचे नाव होते आगाखान बिल्डिंग. या ठिकाणी स्टॉक एक्सचेंजच्या इतर विभागांची कार्यालये होती. ‘जीजीभॉय टॉवर्स’ या नावाने उभी असलेली आजची बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजची २८ मजली इमारत! ज्यांचे नाव या टॉवर्सला दिले आहे ते स्व. फिरोज जीजीभॉय हे दीर्घ काळ बीएसईचे चेअरमन होते. अत्यंत सज्जन, साधी राहणी असलेले, शांत स्वभावाचे, निव्र्यसनी, स्वच्छ चारित्र्याचे, सचोटीचे. चेअरमन असल्यामुळे सर्व प्रकारच्या माहितीचा स्रोत, कंपन्यांच्या बाबतीतील महत्वाची माहिती त्यांच्याकडे उपलब्ध असणे हे अगदी स्वाभाविक होते. पण त्याचा उपयोग करून स्वत: शेअर्समध्ये गुतवणूक करून पसे मिळवणे हे त्यानी कधीच केले नाही. किंबहुना स्टॉक एक्स्चेंजच्या कार्यालयात काम करणाऱ्यांनी शेअर्समध्ये गुंतवणूक किंवा ट्रेडिंग करू नये असे नतिक बंधन त्यांच्या काळात घातले गेले होते व त्यावेळी सर्व जण ते आनंदाने पाळत असत. अर्थात आजच्या काळात असा सोवळेपणा कुणाला हास्यास्पद वाटेल हेही तितकेच खरे!  
स्टॉक एक्स्चेंजचे कर्मचारी, शेअर दलालांच्या कार्यालयातून काम करणारी मंडळी या सर्वानाच स्व. जीजीभॉय यांच्याविषयी परम आदर वाटत असे. आगाखान इमारतीतील आपल्या कार्यालयात जाताना ते इतरांप्रमाणेच लिफ्टसाठी रांगेत उभे रहात असत. समजा त्यांच्यापुढे ५-६ व्यक्ती आधीच उभ्या राहिलेल्या असतील तर त्या आपणहून त्यांच्यामागे येऊन उभ्या राहात जेणेकरून जीजीभॉय साहेब प्रथम लिफ्टमध्ये प्रवेश करू शकतील. इतका आदर होता त्यांच्यासाठी.  कुणीही आदेश काढलेला नव्हता. प्रेमापोटी हे सर्व होत असे. आजकाल एखाद्या बँकेचा उपमहाव्यवस्थापक देखील आलिशान फ्लॅटमध्ये राहतो. पण जीजीभॉय साहेब मात्र काळाघोडा येथील एस्प्लेनेड मॅन्शन या जुनाट इमारतीत राहायचे. कदाचित कुणाला खरे वाटणार नाही पण त्यांच्याकडे स्वतची गाडी नव्हती. ते चालत कार्यालयात येत असत.
२८ मजली टॉवरचे काम सुरू झाले सुमारे १९६७ साली जेव्हा कोयना येथे जबरदस्त भूकंप झाला होता आणि ज्याचे धक्के मुंबईतही जाणवले होते. पायाचे खोदकाम सुरू असतानाचा तो काळ. आता भूकंपाचा धोका मुंबईला कधीही होऊ शकतो हे ध्यानात घेऊन टॉवरचे आíकटेक्ट चंद्रकांत पटेल यांनी बांधकाम अधिक मजबूत व्हावे म्हणून संपूर्ण ढाचाच बदलला व ही मजबूत इमारत उभी केली. भूकंपाच्या तीव्र धक्क्यांना तोंड देऊ शकेल अशा प्रकारचे बांधकाम असलेल्या या जीजीभॉय टॉवरला प्रत्यक्षात सामना करावा लागला तो भूकंपाशी नाही तर १९९३ साली झालेल्या आरडीएक्स बाँबस्फोटाशी! त्यातूनही ही वास्तू ठाम उभी राहिली. १९८१च्या सुमारास टॉवरचे बांधकाम पूर्ण होत आले. पण त्यापूर्वीच १९८० साली जीजीभॉय यांचा मृत्यू झाला. त्या पुण्यपुरुषाचे नाव टॉवरला देण्याचा निर्णय घेतला गेला. पूर्वीच्या आगाखान इमारतीच्या जागी टॉवरच्या बरोबरीनेच उभी असलेली वास्तू म्हणजे रोटंडा बिल्डिंग. तर असे हे स्व. फिरोज जीजीभॉय. केवळ टॉवरला नाव देऊन न थांबता टॉवरच्या प्रवेशद्वारापाशीच त्यांचा पुतळा उभारून बीएसईने त्यांचा यथायोग्य सन्मानही केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा