४ जी शुभारंभाकरिता शाहरुख आणि रेहमान!
मुकेश अंबानी यांचे स्वप्न असलेले ४जी दूरसंचार सेवेचे प्रत्यक्षात पदार्पण अजून तीनेक महिने लांबणीवर पडले असले तरी रिलायन्स या क्षेत्रात खऱ्या अर्थाने बाजीगर ठरली आहे. ४जी तंत्रज्ञानात काहीसे उशिरा पदार्पण करणाऱ्या रिलायन्स जिओने तिच्या या नव्या सेवेकरिता शाहरुख खानला करारबद्ध केले आहे. तर सेवेकरिता तयार करण्यात आलेले संगीत ए. आर. रेहमान यांचे आहे.
भारतात ४जी सेवेचे अस्तित्व सर्वप्रथम निर्माण केलेली भारती एअरटेल ही ग्राहकसंख्येत अव्वल दूरसंचार कंपनी आहे. शाहरुख आणि रेहमान यांनी यापूर्वी एअरटेलचे राजदूत म्हणून काम पाहिले आहे. त्यानंतर ही भूमिका करिष्मा कपूर व सैफ अली खान यांच्याकडे आली होती. या क्षेत्रात सध्या आयडिया सेल्युलरचा अभिषेक बच्चन हा राजदूत आहे. शाहरुख व रेहमान हे दोघेही आता रिलायन्सच्या नव्या ४जीकरिता सज्ज झाले आहेत.
रिलायन्स जिओची ही ४जी सेवा परवाच्या रविवारी, २७ डिसेंबर रोजी एका मोठय़ा समारंभात सादर होत आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे संस्थापक व मुकेश अंबानी यांचे पिता स्व. धीरुभाई अंबानी यांच्या ८३ व्या जयंतीनिमित्त ही सेवा पहिल्या टप्प्यात केवळ समूहाच्या कर्मचाऱ्यांकरिताच सुरू होईल. सेवेकरिता कर्मचाऱ्यांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही; मात्र मोबाइल सवलतीच्या किंमतीत उपलब्ध होतील.
रिलायन्सच्या नवी मुंबई (घणसोली) येथील ‘डीएकेसी’ परिसरात या सेवेचे रविवारी उद्घाटन होणार असून त्याला कंपनीचे एक लाख कर्मचारी तसेच अन्य ३५,००० पाहुणे उपस्थित राहणार आहेत. रिलायन्स जिओच्या ४जी सेवेचे प्रत्यक्षातील पदार्पण मात्र एप्रिल २०१६ मध्येच होण्याची शक्यता आहे.
मोबाइल क्षेत्रात जलद मानली जाणाऱ्या ४जी सेवेकरिता देशव्यापी परवाना मिळालेली रिलायन्स ही एकमेव कंपनी आहे. नव्या सेवेकरिता लागणाऱ्या निधी तसेच तंत्रज्ञानाच्या उभारणीमध्ये विलंब झाल्याने रिलायन्स जिओची सेवा गेल्या वर्षभरापासून प्रलंबित होती. आयडियाने गुरुवारीच दक्षिण भारतातून तिच्या ४जी सेवेला प्रारंभ केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा