केंद्र सरकारकडून विक्रीस खुल्या झालेल्या सार्वभौम सुवर्ण रोख्यांच्या किंमत निश्चितीत महत्त्वाची भूमिका प्रदान केल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतानाच, या योजनेतील करविषयक विविध संभ्रम दूर करण्याची विनंती सराफ उद्योगाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (आयबीजेए)ने केली आहे. ‘आयबीजेए’कडून प्रति दिन शुद्ध सोन्याचा बंद भाव हे या रोख्यांसाठी संदर्भ मूल्य असणार आहे.

प्रस्तावित सुवर्ण रोख्यांची किंमत ही आदल्या सप्ताहातील (सोमवार ते शुक्रवार) आयबीजेएकडून जाहीर होणाऱ्या ९९९ शुद्ध सोन्याच्या बंद भावाची सरासरी असेल. गेली ६७ वर्षे आयबीजेएकडून जाहीर सोन्याचे भाव हे सीमाशुल्क, अबकारी शुल्क, प्राप्तिकर या सरकारी विभागांसह बँकांकडून वापरात आले आहेत. नव्या योजनेतही आयबीजेएला अधिकृतपणे हाच बहुमान प्रदान केल्याबद्दल असोसिएशनचे अध्यक्ष मोहित कम्बोज यांनी पत्रकार परिषद केंद्र सरकार व अर्थमंत्र्यांचे आभार व्यक्त केले. तथापि अर्थमंत्र्यांनी आगामी अर्थसंकल्पातून काही करविषयक उणिवा दूर कराव्यात अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

पूर्वनियोजित आंतरराष्ट्रीय बाजारमंचावरील किंमत संदर्भ मूल्य म्हणून निश्चित करण्याऐवजी आयबीजेएकडून जाहीर होणारे भावच मानदंड राहतील, असे जाहीर झालेल्या योजनेतून पुढे आले आहे. तथापि आयबीजेएच्या किमतीत विद्यमान आयात शुल्कही समाविष्ट आहे. जे सोने आयातीला पायबंद म्हणून गेल्या दोन वर्षांत १० टक्क्य़ांपर्यंत वाढले आहे. सुवर्ण रोख्यांच्या मुदतपूर्तीसमयी आयात शुल्काची मात्रा खाली येईल आणि परिणामी सोन्याची आनुषंगिक किंमतही घटेल. अर्थात हे गुंतवणूकदारांच्या परताव्यात कपात करणारे ठरेल. ५ नोव्हेंबरपासून विक्रीला खुला झालेला सुवर्ण रोख्यांचा प्रति ग्रॅम २६८४ रुपये हा दर हा आताच विद्यमान ९९९ शुद्धतेच्या सोन्याच्या आयबीजेएकडून जाहीर किमतीपेक्षा जास्त असल्याचे दिसत आहे. २६ नोव्हेंबरपासून या रोख्यांचे त्यावेळच्या संदर्भ किमतीनुसार शेअर बाजारात नियमित खरेदी-विक्री व्यवहार सुरू होतील.

Story img Loader