भांडवली बाजारातील तेजीच्या जोरावर मेमध्ये सार्वकालिक १० लाख कोटी रुपयांवर गेलेली देशातील म्युच्युअल फंड गंगाजळी पुढील पाच वर्षांत दुप्पट होण्याचा आशावाद, या उद्योगाचे नेतृत्व करणाऱ्या संघटनेने व्यक्त केला आहे.
भारतातील म्युच्युअल फंड कंपन्यांची संघटना असलेल्या ‘अ‍ॅम्फी’ने म्हटले आहे की, येत्या चार ते पाच वर्षांत फंड कंपन्यांची मालमत्ता २० लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक होण्याची शक्यता आहे.
देशात विविध ४५ म्युच्युअल फंड असून त्यांच्यामार्फत दोन हजारांहून अधिक फंड योजनांचे वित्तीय व्यवस्थापन होते. फंडांची मालमत्ता गेल्या महिन्यात ९.८५ लाख कोटी रुपये झाली होती. फंड कंपन्यांची मालमत्ता मे २०१४ मध्ये सर्वाधिक १०.११ लाख कोटी रुपये नोंदली गेली आहे. तर डिसेंबर २०१३ अखेर ती ८ लाख कोटी रुपये होती.
फोलिओ संख्येत वाढ होत असल्याने तसेच प्रामुख्याने छोटय़ा शहरांमधून या गुंतवणूक पर्यायात निधीचा अधिक ओघ सुरू असल्याचे संघटनेला निदर्शनास आल्याने त्याच्या दीर्घकालीन वाढीचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. फंड प्रकारात किरकोळ गुंतवणूकदारांचा ओढा कमी असल्याबद्दल बाजार नियामक सेबीने वेळोवेळी चिंता व्यक्त केली आहे. या पाश्र्वभूमीवर सेबीने या उद्योगासाठी फेब्रुवारीमध्ये विविध करलाभ जारी करीत धोरण जाहीर केले होते.
१५ मोठय़ा शहरांव्यतिरिक्त अन्य ठिकाणी फंड कंपन्यांना वितरण शुल्क वाढविण्यास सेबीने २०१२ मध्ये मुभा दिली होती. अमेरिकेसारख्या विकसित राष्ट्रामध्ये ४४ टक्के घरटी फंड योजनांमध्ये गुंतवणूक करीत असताना भारतात मात्र हे प्रमाण अवघे २.५ टक्केच आहे.

Story img Loader