गेल्या आर्थिक वर्षांत गुंतवणूकदारांच्या हितार्थ नियमांमध्ये अनेक बदल करण्यात आलेल्या  देशातील म्युच्युअल फंड उद्योगाची मालमत्ता पाच टक्क्यांच्या घरात वाढली असली तरी याच वर्षांत गुंतवणूकदार मात्र तब्बल २९ लाखांनी घटले आहेत. २०१३-१४ आर्थिक वर्षांत देशातील ४६ म्युच्युअल फंडांकडील एकूण गुंतवणूकयोग्य मालमत्ता (गंगाजळी) ४० हजार कोटी रुपयांनी वधारून ८.६ लाख कोटी रुपयांवर गेली आहे.
एचडीएफसी म्युच्युअल फंडाने सर्वाधिक गंगाजळी उभारण्यात आघाडी कायम ठेवली असून,  एक लाख कोटी रुपयांच्या गंगाजळीच्या पंक्तीत आता आयसीआयसीआय प्रुडेन्शिअलही जाऊन बसली आहे. मार्च २०१३अखेर एचडीएफसी म्युच्युअल फंडची मालमत्ता १.१३ लाख कोटी रुपये नोंदली गेली आहे. तर आयसीआयसीआयची १.०७ लाख कोटी रुपये फंड मालमत्ता झाली आहे.
एचडीएफसीपासून ६,००० कोटी रुपयांनी लांब असलेल्या आयसीआयसीआयने यंदा २२ टक्के वाढीसह प्रथमच एक लाख कोटी रुपयांच्या फंड मालमत्तेत प्रवेश केला आहे. एचडीएफसीच्या तुलनेत आयसीआयसीआय प्रुडेन्शिअलची मालमत्ता दुपटीने वाढली आहे. एक लाख कोटींच्या श्रेणीत सध्या रिलायन्स म्युच्युअल फंडही आहे.
जवळपास निम्म्या फंड कंपन्यांची मालमत्ता यंदा नकारात्मक नोंदली गेली आहे. तर २८ कंपन्यांची मालमत्ता ही १०,००० कोटी रुपयांच्याही आतच आहे. ५०,००० कोटी रुपये मालमत्ता राखणाऱ्या सहा फंड कंपन्या आहेत. एक लाख रुपयांच्या श्रेणीतील तिन्ही कंपन्यांचा मिळून एकूण फंड व्यवसायातील हिस्सा ३८ टक्के राहिला आहे. मालमत्तेत वाढ राखणाऱ्या कंपन्यांची संख्या तुलनेत कमी आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mutual fund asset raised but investment reduced