चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्याच महिन्यात एक लाख कोटी रुपयांनी अधिक गुंतवणूक करत गुंतवणूकदारांनी म्युच्युअल फंडांना अधिक पसंती दिली आहे. या एका महिन्यात करण्यात आलेली गुंतवणूक ही गेल्या तीन वर्षांतील सर्वाधिक गुंतवणूक झाली आहे.
मार्चमध्ये १.०९ लाख कोटी रुपये म्युच्युअल फंडांमध्ये गुंतविले गेल्यानंतर, त्या पुढच्या एप्रिल २०१४ मध्ये १.१२ लाख कोटी रुपयांचा निधी या गुंतवणूक प्रकारात गुंतवणूकदारांनी ओतला. २०१३-१४ या आर्थिक वर्षांतही म्युच्युअल फंडांमधील नक्त ओघ आधीच्या वर्षांच्या ७६ हजार कोटी रुपयांच्या तुलनेत केवळ ५४ हजार कोटी रुपये इतकाच होता.
‘सेबी’ या भांडवली बाजार नियंत्रकांकडून प्रसिद्ध ताज्या आकडेवारीनुसार, एप्रिलमध्ये गुंतवणूकदारांनी म्युच्युअल फंडांमध्ये निव्वळ १,१२,४३३ कोटी रुपये गुंतविले आहेत. एप्रिल २०११ मधील १.८४ लाख कोटी रुपयांनंतरची ही सर्वात मोठी रक्कम आहे.
३० एप्रिल २०१४ अखेर फंडांमध्ये असलेला गुंतवणूकदारांचा निधी हा ९.४५ लाख कोटी रुपये झाला आहे. ४० हून अधिक फंड घराण्यांच्या जवळपास विविध ५०० योजना आहेत. गेल्या काही वर्षांत भारतीय फंड उद्योगात विलीनीकरणाची प्रक्रिया घडली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mutual fund investment rises