म्युच्युअल फंड उद्योगाने चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्या नऊ महिन्यांत गुंतवणूकदार खातेसंख्येत सात लाखांची नव्याने भर अनुभवली आहे. म्युच्युअल फंडांमधील इक्विटीशी संबंधित खात्यांच्या जोरावर एकूण फंड उद्योगाने ही कामगिरी बजावली आहे.
आर्थिक वर्ष २०१३-१४ मध्ये भारताच्या म्युच्युअल फंड उद्योगाने ३३ गुंतवणूक खाती गमावली होती. चालू आर्थिक वर्षांतील एप्रिल ते डिसेंबर या नऊमाही दरम्यान मात्र एकूण म्युच्युअल फंड खाती ४.०३ कोटी झाली आहेत. मार्च २०१४ अखेर ३.९५ कोटी असलेल्या खात्यांमध्ये यंदाच्या पहिल्या नऊ महिन्यांमध्ये ७.२८ लाख खात्यांची भर पडली आहे. नवनव्या इक्विटी योजनांचा सुकाळ आणि त्याकडे गुंतवणूकदारांचा ओढा पाहता, चालू आर्थिक वर्षांच्या शेवटच्या तिमाहीतील आकडेवारीने हा टप्पा अधिक उंचावण्याची शक्यता आहे.
‘असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया’ने (अ‍ॅम्फी) याबाबत दिलेल्या आकडेवारीद्वारे ४५ फंड कंपन्यांमधील खात्यांचा अभ्यास केला गेला आहे. एकाच गुंतवणूकदाराद्वारे अनेक खात्यांचाही यात समावेश आहे, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
डिसेंबर २०१४ अखेरच्या ४.०३ कोटी फंड खात्यांमध्ये किरकोळ गुंतवणूकदारांची संख्या ३.८६ कोटी आहे, तर उच्च मालमत्ताधारकांची संख्या १३.२२ लाख व संस्थागत गुंतवणूकदार ३.३४ लाख आहे. वधारत्या भांडवली बाजारामुळे इक्विटी फंड क्षेत्रातील किरकोळ गुंतवणूकदारांची संख्या वाढल्याचे ‘अ‍ॅम्फी’ने म्हटले आहे.
म्युच्युअल फंड खातेदारांची संख्या मार्च २००९ पासून सातत्याने घसरती राहिली आहे. एप्रिल ते डिसेंबर २०१४ दरम्यान इक्विटी क्षेत्रातील खाती १२ लाखांनी वाढली आहेत. डिसेंबरअखेर ती एकूण ३.०३ कोटी झाली आहेत. गेली चार वर्षे या क्षेत्रातील फंड खात्यांची ओहोटी राहिली आहे. या नऊ महिन्यांमध्ये मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स २३ टक्क्यांनी उंचावला आहे.
इक्विटी फंडांमुळे किरकोळ गुंतवणूकदारांची संख्या वाढली असली तरी एकूण फंड उद्योग हे गुंतवणूकदारांच्या वित्तीय जागरूकतेबद्दल प्रसार करत असल्याने या क्षेत्राची आगामी कालावधीतील वाढ अधिक अपेक्षित आहे.
– पुनीत चढ्ढा,
मुख्य कार्यकारी अधिकारी, एचएसबीसी ग्लोबल अ‍ॅसेट मॅनेजमेंट

Story img Loader