म्युच्युअल फंड कंपन्यांकडून होणाऱ्या गुंतवणूकदारांच्या मालमत्तांचे व्यवस्थापन २०१३ मध्ये ८५ हजार कोटी रुपयांनी वधारले असून, डिसेंबरअखेर ते ८.७८ लाख कोटी रुपये राहिले आहे. वार्षिक ११ टक्के वाढ नोंदविणाऱ्या या क्षेत्रात अर्थातच एचडीएफसी ही कंपनी एकूण मालमत्तेसह सर्वोच्च स्थानावर कायम राहिली आहे. मात्र निधी वाढीत तिला आयसीआयसीआय प्रुडेन्शियल आणि रिलायन्सने अनुक्रमे गंगाजळीत दुसऱ्या व तिसऱ्या स्थानी असलेल्या फंड घराण्यांनी मागे टाकले आहे.
भांडवली बाजारातील कंपनी समभाग मूल्याच्या प्रवासावर आधारित फंड परतावा देण्यासाठी हा गुंतवणूक प्रकार खूपच लोकप्रिय ठरला आहे. अशा फंड कंपन्यांची संख्या देशभरात सध्या ४४ आहे. त्यांच्यामार्फत डिसेंबर २०१३ पर्यंत ८,७७,९७३ कोटी रुपयांचे निधी व्यवस्थापन झाले आहे. फंड उद्योग वाढीत ५७ टक्के हिस्सा हा देशातील आघाडीच्या पाच कंपन्यांचा आहे. क्षेत्राने सलग दोन वर्षे निधी घसरण नोंदविल्यानंतर यंदा सलग दुसऱ्या वर्षांत फंड वाढ नोंदविली आहे.
म्युच्युअल फंड कंपन्यांची देशव्यापी संघटना असलेल्या ‘असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया’च्या आकडेवारीनुसार २०१२ मध्ये ७,९३,३३१ कोटी रुपयांचे निधी व्यवस्थापन झाले होते. भांडवली बाजार नियामक सेबीने उचलेल्या गुंतवणूकपूरक पावलांमुळे २०१४ मध्ये ही रक्कम वाढेल, असा विश्वासही संघटनेने व्यक्त केला आहे.
भारतीय फंड क्षेत्रात अनेक विदेशी कंपन्याही आहेत. (डायवा फंड एसबीआय म्युच्युअल फंड कंपनीत गेल्याच वर्षांत विलीन करण्यात आला.) पैकी स्थानिक फंड कंपन्यांमार्फत गेल्या वर्षांत ५,७७७ कोटी रुपयांचे निधी व्यवस्थापन झाले आहे. ४४ पैकी २६ कंपन्यांनी २०१३ मध्ये निधी वाढ नोंदविली आहे, तर १७ कंपन्यांच्या गुंतवणूक रकमेला ओहोटी लागली आहे. यामध्ये टाटा, इंडियाबुल्स, आयडीबीआय आदींचा समावेश आहे. या उद्योगाने गेल्या वर्षांतीलच एका महिन्यात ९ लाख कोटी रुपयांच्या निधीचा आकडा पार केला होता.
फंड कंपन्यांमध्ये १.०९ लाख कोटी रुपयांसह एचडीएफसी आघाडीवर आहे. (डिसेंबरमध्येच कंपनीने मॉर्गन स्टॅनलेच्या आठही योजना ३,२९० कोटी रुपयांना खरेदी केल्या.) तिने वार्षिक तुलनेत ७.५ टक्के वाढ नोंदविली आहे. मात्र आयसीआयसीआय प्रुडेन्शिअल व रिलायन्स म्युच्युअल फंड कंपनीने तुलनेत अधिक, अनुक्रमे १९ व १३ टक्के वाढ राखली आहे. निधी गुंतवणुकीत आयसीआयसीआय प्रुची रक्कम ९७,२०० कोटी रुपये, तर रिलायन्सची १.०२ लाख कोटी रुपये राहिली आहे. अनिल धीरूभाई अंबानी समूहातील रिलायन्स कॅपिटलच्या या कंपनीने तब्बल दोन वर्षांनंतर एक लाख कोटी रुपयांचा टप्पा पार करत एचडीएफसीला स्पर्धा निर्माण केली आहे.
आघाडीचे तीन फंड घराणी           गंगाजळी (डिसेंबरअखेर)     वार्षिक वाढ%
एचडीएफसी म्युच्युअल फंड              ” १.०९ लाख कोटी              ७.५%
रिलायन्स म्युच्युअल फंड                  ” १.०२ लाख कोटी             १३%
आयसीआय. प्रुडेन्शियल                    ” ९७,२०० कोटी                 १९%

Story img Loader