इन्फोसिसकडून खंडन; समभाग मूल्यात घसरण

विप्रोच्या प्रवर्तकांच्या हिस्सा विक्रीच्या चर्चेचा धुरळा शमत नाही तोच आता इन्फोसिसचे संस्थापकही आपला हिस्सा विकत असल्याची चर्चेने डोके वर काढले. कंपनीकडून लगोलग खुलासा केला गेला तरी पसरलेल्या अफवेतून शुक्रवारच्या व्यवहारात इन्फोसिस समभाग मूल्याला घसरणीचा फटका दिला.

इन्फोसिसचे संस्थापक अध्यक्ष एन. आर. नारायण मूर्ती हे कंपनीतील आपला संपूर्ण हिस्सा विकण्याची चर्चा शुक्रवारी अचानक जोर धरू लागली. कंपनीने मात्र या वृत्ताचे ताबडतोब खंडन केले. मूर्ती यांच्यासह संस्थापक प्रवर्तकांचा इन्फोसिसमध्ये १२.७५ टक्के हिस्सा आहे. देशातील दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या या माहिती तंत्रज्ञान कंपनीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या वेतनमानावरून मूर्ती यांचे मतभेद यापूर्वीच समोर आले आहेत. यामुळे कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल सिक्का व मुख्य परिचलन अधिकारी प्रवीण राव तसेच माजी वित्तप्रमुख राजीव बन्सल हे मूर्ती यांच्या टीकेचे धनी बनले होते.

कंपनीचे प्रवर्तक अशा प्रकारे हिस्सा विकणार आहेत, अशी कोणताही माहिती इन्फोसिसकडे अद्याप नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. मूर्ती यांच्याबरोबरचे सह संस्थापक के. गोपालकृष्णन, नंदन निलेकणी, के. दिनेश, एस. डी. शिबुलाल आदीही कंपनीतील आपला हिस्सा विकण्याची चर्चा सुरू आहे.

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील विप्रो यापूर्वी प्रवर्तकांच्या हिस्सा विक्रीमुळे चर्चेत आली होती. अखेर विप्रोचे संस्थापक अध्यक्ष अझीम प्रेमजी यांनी असा कोणताही विचार नसल्याचे स्पष्ट करत काही दिवसांपूर्वी या चर्चेला पूर्णविराम दिला होता.

मूर्ती व त्यांच्या सह संस्थापकांनी १९८१मध्ये इन्फोसिसची स्थापना केली होती. कंपनीतील सुशासनावरून मूर्ती यांनी आक्षेप घेतल्यानंतर कंपनीचा आढावा घेण्यासाठी एका कायदेविषयक समितीची नियुक्ती करण्यात आली.

समभागाला फटका

प्रवर्तक आपला हिस्सा विकण्याच्या चर्चेने इन्फोसिसच्या समभागाने आठवडय़ातील शेवटच्या सत्रात महिन्यातील मूल्यतळ नोंदविला. शुक्रवारच्या व्यवहारात इन्फोसिसच्या समभाग मूल्यावर या अफवेची काळी छाया दिसून आली. विक्रीचा दबाव येऊन इन्फोसिसमध्ये ३.५० टक्क्यांपर्यंत घसरण झाली होती. एकूणच माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात गुरुवारच्या सत्रातही विक्रीचा दबाव होता. शुक्रवारीही या क्षेत्रातील इन्फोसिससह अनेक कंपन्यांच्या समभागांचे मूल्य रोडावले. उत्तरार्धात बाजाराने कलाटणी घेतली तसे इन्फोसिसचा समभागही सावरला. तरी दिवसअखेर गुरुवारच्या तुलनेत ०.८० टक्क्यांनी घसरून तो ९४८.६५ रुपयांवर स्थिरावला.