सचिन रोहेकर / गौरव मुठे, लोकसत्ता

मुंबई : मागील पाच वर्षांत राष्ट्रीय शेअर बाजार अर्थात एनएसईच्या मूल्य-साखळीतील प्रत्येक विभाग आधुनिकीकरण आणि परिवर्तनातून गेला आहे. एकंदर मूल्यसंस्कृतीत बदलासाठी ते उपकारक ठरले आणि याचे प्रत्यंतर कार्यप्रदर्शनाचे वेगवेगळे मापदंड पाहिल्यास नेमके लक्षात येईल, असे प्रतिपादन नॅशनल स्टॉक एक्सचेंज लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रम लिमये यांनी केले.

लिमये यांचा एनएसईच्या प्रमुखपदाचा कार्यकाळ शनिवारी, आज संपुष्टात येणार आहे. या पदावर मुदतवाढ अथवा फेरनियुक्तीसाठी ते स्वत:च उत्सुक नसल्याचे त्यांनी चार महिन्यांपूर्वीच स्पष्ट केले होते. ‘लोकसत्ता’शी साधलेल्या संवादात, जोखीम व्यवस्थापन, नियामक परिणामकारकता, तंत्रज्ञान, देखरेख व नियंत्रण, सुशासन आणि सर्व भागधारकांशी सुसंवाद यांसह ‘एनएसई’ला स्थिरता, मजबुती आणि वाढीला चालना देण्यासाठी सर्वोत्तम प्रयत्न केल्याचे समाधान व्यक्त केले.

नक्की वाचा >> …म्हणून एलॉन मस्क स्वत:च्या वडिलांशी बोलत नाही; एरोल मस्क यांच्याकडून धक्कादायक माहिती उघड

पाच वर्षांपूर्वी अत्यंत नाजूक स्थिती असताना कारभार हाती आला. तत्कालीन प्रमुख चित्रा रामकृष्ण यांचे वादग्रस्त निर्गमन, २०१२ ते २०१५ या काळात झालेले घोटाळे – गैरव्यवहारांनी नुकतेच डोके वर काढले होते. नियामकांकडून सुरू झालेल्या चौकशांच्या जंजाळात, जवळपास ८० टक्के वरिष्ठ व्यवस्थापनातील अधिकारी व्यस्त होते. अशा समयी ही संस्था चालविणे, तिला पुढे नेणे हे काम निश्चितच सोपे नव्हते, असे लिमये यांनी प्रारंभिक काळाला उजाळा देताना सांगितले. 

लिमये म्हणाले, ‘विमान हवेत झेपावले आहे आणि तशा समयी त्यातील बिघाड दुरुस्त करण्यासारखी ही अवघड कसरत होती. म्हणजे एकीकडे बाजार व्यवस्थेचा विकास व नियमनाच्या प्राथमिक जबाबदारीसह, वारसारूपाने आलेल्या घोटाळे-गैरव्यवहार आणि चौकशांचा सुरू असलेला ससेमिऱ्याचे व्यवस्थापन आणि त्याचसमयी संस्थेची विश्वासार्हता, प्रतिष्ठा जपत तिच्या वाढीचे प्रयत्न सुरू राहिले. शिवाय मागील पाच वर्षांतील दोन-अडीच वर्षे ही करोना महासाथीच्या परिणामी एकंदर कामकाज बाधित झाली असताना हे सारे प्रयत्न सुरू राहिले, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

‘एक राष्ट्रीय महत्त्वाची संस्था म्हणून, ‘एनएसई’च्या माध्यमातून भारतीय भांडवली बाजार परिसंस्था अधिक पारदर्शक, मजबूत आणि सुरक्षित बनवण्याच्या दिशेने काम करणे आपले कर्तव्य आहे. ही कर्तव्यपूर्तीची भावना जर प्रत्येकाने, ‘प्रथम प्राधान्य संस्थे’ला अशी मनोभूमिका घेऊन ठेवली तर मग संस्थेच्या हितासाठी काय उचित आणि काय अनुचित याबाबत कोणताही संभ्रम राहत नाही. सूत्रे हाती घेताच प्रत्येक विभागातील शेवटच्या कर्मचाऱ्यांपर्यंत हा संदेश पोहचविला,’ असे लिमये यांनी सांगितले. कारभाराचा दर्जा सुधारण्यासाठी, तसेच पारदर्शकता व विश्वासार्हता राखण्यासाठी योजना बनविली आणि तिला सर्व सहकारी, संचालक मंडळ, सर्व भागधारकांनी पाठबळ दिल्याचे त्यांनी सांगितले.

जगातील इतर कोणतेही एक्सचेंज प्रति सेकंद अडीच लाखापेक्षा जास्त कार्यादेश अर्थात ऑर्डर्सवर प्रक्रिया करू शकत नाही, परंतु एनएसईच्या तंत्रज्ञान यंत्रणेने प्रति सेकंद तीन लाख ऑर्डर्सवर प्रक्रिया करण्याची क्षमता ऐन करोनाकाळात ओलांडली आणि सध्या दिवसाला १२ अब्ज ऑर्डरसंबंधीचे संदेश ती हाताळते. ज्याचे प्रमाण दोन वर्षांपूर्वी दोन अब्ज इतके होते, म्हणजे सहा पटींची ही कल्पनातीत वाढ आहे. दोन वर्षांत, चार कोटी गुंतवणूकदारांनी डीमॅट खाती उघडली आणि एनएसईच्या स्थापनेपासून २३ वर्षांत जितके गुंतवणूकदार बाजारात सक्रिय होते, तितक्याच गुंतवणूकदारांची केवळ दोन वर्षांत भर पडली आहे.

लिमये यांच्या कार्यकाळातील एनएसईच्या कामगिरीचे टप्पे

*  आंतरराष्ट्रीय सहयोग, भागीदाऱ्यांमध्ये वाढ

*  ‘एसजीएक्स निफ्टी’चे व्यवहार सिंगापूरऐवजी, भारतातून ‘गिफ्ट-सिटी’मधून सुरू

*  एनएसई डेटा, निर्देशांक, तंत्रज्ञान आणि शिक्षण अशा एक्सचेंज-बाह्य क्षेत्रांमध्ये चार कंपन्यांचे संपादन आणि व्यवसाय विस्तार

*  लघु व मध्यम उद्योगांचे (एसएमई) पालकत्व स्वीकारून त्यांच्या जोमदार वाढीसाठी संस्थात्मक प्रयत्न

*  आपत्ती व्यवस्थापन (बॅक-अप) यंत्रणेवर स्थानांतरणासाठी ‘सेबी’चा दंडक चार तासांचा असताना एनएसईकडून अवघ्या ४५ मिनिटांच्या कालावधीत स्थानांतरण शक्य

आयपीओतूर्तास नाही

सध्या नियमकाकडून आधीच्या काळात घडलेल्या घटनांविषयी चौकशी सुरू असल्याने तूर्तास तरी राष्ट्रीय शेअर बाजाराचा प्रारंभिक समभाग विक्री अर्थात ‘आयपीओ’संबंधाने विचाराचा प्रश्नच पुढे येत नाही. तथापि कोणाही सूचिबद्ध कंपनीला आवश्यक ठरणाऱ्या अनुपालनांची पूर्तता एनएसईकडून खूप आधीपासूनच केली जात आहे, असे विक्रम लिमये यांनी स्पष्ट केले.

नियमन परिणामकारकता आणि तांत्रिक सक्षमता या अशा बाबी आहेत, ज्यातून मजबूत जोखीम व्यवस्थापन होण्यासह, विश्वासार्हता वाढीस लागते. बाजाराच्या विकासासाठी विश्वासार्हता अत्यावश्यक गोष्ट आहे आणि दोन वर्षांत दाखल झालेले ४ कोटी नवगुंतवणूकदार पुढेही बाजारात टिकून राहतील, याचीही ती हमी आहे. ‘एनएसई’ने याच आघाडीवर योजना बनवून गेल्या अडीच-तीन वर्षांत मोठा पल्ला गाठल्याचे समाधान आहे.  

विक्रम लिमये, व्यवस्थापकीय संचालक व मुख्याधिकारी, एनएसई लिमिटेड

आर्थिक कामगिरी (आकडे कोटी रुपयात)

आर्थिक वर्ष            २०१७         २०२२

महसूल              २,६८१        ९,५००

निव्वळ नफा          १,२१९        ५,१९८

भांडवलावरील परतावा     १७ टक्के             ३८ टक्के

व्यावसायिक कामगिरी (टक्क्यांमध्ये)

बाजार हिस्सा           २०१७   २०२२

कॅपिटल मार्केट (कॅश)    ८५     ९३

इक्विटी फ्युचर्स        १००    १००

इक्विटी ऑप्शन्स       ९८     १००

करन्सी फ्युचर्स        ५४     ७०

करन्सी ऑप्शन्स        ६३     ९५

आरएफक्यू बॉण्ड        ००     ९९

Story img Loader