मुंबई : देशातील गुंतवणुकीचे अग्रगण्य ठिकाण बनण्यासाठी आणि राज्यातील गुंतवणुकीच्या संधींचे प्रदर्शन करण्यासाठी ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी मुंबईत गुंतवणूकदारांची भेट घेतली. ओडिशा राज्य सरकारने पुढील महिन्यात भुवनेश्वर येथे ३० नोव्हेंबर ते ४ डिसेंबर २०२२ दरम्यान ‘मेक इन ओडिशा कॉन्क्लेव्ह’चे आयोजन केले आहे. या अनुषंगाने ओडिशा सरकारने मुंबईत माहिती-तंत्रज्ञान, मेटल डाऊनस्ट्रीम, अक्षय्य ऊर्जा, रसायने, प्लास्टिक आणि प्रगत इलेक्ट्रॉनिक उत्पादन क्षेत्रातील उद्योजकांना गुंतवणुकीसाठी आमंत्रित केले आहे.
हेही वाचा >>> Vedanta Foxconn पंतप्रधान मोदींनी गैरपद्धतीने वेदान्त-फॉक्सकॉन गुजरातला नेला; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची टीका
ओडिशा १०.१ टक्के अशी दमदार विकासगती राखणारे आघाडीचे राज्य असून उद्योगांसाठी गुंतवणूकस्नेही वातावरण आहे, असे मुख्यमंत्री पटनाईक यांनी गुंतवणूकदारांच्या मेळाव्यात सांगितले. राज्यातील नैसर्गिक साधनसंपत्ती आणि धोरणात्मक स्थान यामुळे देशातील एक प्रमुख औद्योगिक स्थळ म्हणून ते वेगाने उदयास येत आहे. ओडिशाची विपुल नैसर्गिक संसाधने, कुशल आणि उत्पादक मानवी संसाधने, प्रगतिशील धोरणे आणि मजबूत परिणामाभिमुख शासन अशी अद्वितीय परिसंस्था प्रदान करते. त्यामुळे अधिकाधिक गुंतवणूकदारांनी राज्यात येऊन गुंतवणूक करण्याचे आवाहन त्यांनी केले. याआधीच्या २०१६ आणि २०१८ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या अशा उपक्रमांमधून राज्यात अनुक्रमे २ लाख कोटी रुपये आणि ४.१९ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक झाली असल्याचा त्यांनी दावा केला.
तीन दिवसांच्या मुंबई दौऱ्यात आदित्य बिर्ला समूहाचे अध्यक्ष कुमार मंगलम बिर्ला, वेदान्त रिसोर्सेस लिमिटेडचे अध्यक्ष अनिल अग्रवाल आणि मिहद्र समूहाचे अध्यक्ष आनंद मिहद्र यांच्यासह प्रमुख उद्योगपतींची पटनाईक यांनी भेट घेतली. त्याचबरोबर स्टेट बँकेचे अध्यक्ष दिनेश कुमार खरा, आयसीआयसीआय बँकेचे कार्यकारी संचालक राकेश झा आणि एचडीएफसी बँकेचे अरिवद वोहरा यांसारख्या आघाडीच्या बँक प्रमुखांचीही त्यांनी भेट घेतली.