आठवडय़ाची मुलाखत
देशातील एखाद्या मोठय़ा राजकीय आखाडय़ाप्रमाणे संस्थेची यंदाची निवडणूक प्रक्रिया पार पडली. या दरम्यान तुमची भूमिका काहीशी वर्चस्व गाजवणारी होती, अशी प्रतिमा निर्माण झाली आहे..
संस्थेतील गैरप्रकाराला आळा घालणे हे केवळ सरचिटणीस म्हणून नव्हे तर आधी एक सदस्य म्हणून मी माझी जबाबदारी समजतो. काही निवडक हितसंबंधियांमुळे संस्था यापूर्वी अनेकदा तिच्या मूळ उद्देशापासून दूर जात होती. संस्थेला तिचे मूळ कार्य करण्यात कुणी बाधा आणत असेल तर ते थांबविणे हे सर्वाचेच मुख्य उद्दिष्ट असले पाहिजे. संस्थेच्याही ते हितार्थच असावे, असे मला वाटते.
* पण आता निवडून आलेली बिनविरोध कार्यकारिणी कितपत यशस्वी ठरेल, असे तुम्हाला वाटते?
कार्यकारिणीवरील सदस्य संख्येबाबत सांगायचे तर यंदा ती अधिक असणे हे खरे तर एक आव्हानच आहे; मात्र तिचा संधी म्हणून संस्थेच्या कार्याकरिता उपयोगी करता येऊ शकतो. संस्थेला तिचा संबंध येणाऱ्या प्रत्येक सदस्य, आस्थापनांबाबतचा मार्ग सुकर होण्यासाठी हे फायदेशीर ठरेल. ‘ओएआय’च्या स्थापनेच्या इतिहासात अध्यक्ष म्हणून प्रथमच युवा नेतृत्व लाभले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली संस्थेने येत्या दोन वर्षांच्या कालावधीत अनेक महत्त्वपूर्ण योजना मार्गी लावण्याचे ध्येय राखले आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या वापराबाबत संस्था तुलनेत सध्या खूपच मागे आहे. संस्थेच्या प्रसारासाठी हे मुख्य साधन म्हणून अंगिकारले जाईल.
* संस्था व संस्थेच्या कार्याविषयी काय सांगाल?
‘ऑस्टोमी असोसिएशन ऑफ इंडिया’ अर्थात ‘ओएआय’ ही १९७५ मध्ये अस्तित्वात आली. कधी नैसर्गिक अथवा तर बहुतांशवेळा आरोग्यविषयक तक्रारींमुळे मनुष्याच्या मल तसेच मूत्र विसर्जनाकरिता त्याच्या शरिरावर शस्त्रक्रियेद्वारे कृत्रिम मार्ग तयार करून दिला जातो, याला ‘ऑस्टोमी’ म्हणतात. अन्य एखाद्या अपंग व्यक्तीप्रमाणेच अशा समस्येला सामोरे जावे लागणाऱ्यांचे पूरक साहित्य देऊन तसेच मानसिकरित्या पुनर्वसन करणे ही संस्थेची जबाबदारी आहे. टाटा रुग्णालय आणि इंडियन कॅन्सर सोसायटी (आयसीएस) यांचे सदैव सहकार्य लाभलेली भारतातील ही अशा धर्तीची भारतातील पहिली संस्था आहे. मुंबई मुख्यालयाद्वारे तिचा कार्यभार सर्वत्र पसरला आहे.
* विस्तारासाठी तुमच्या नेमक्या योजना काय आहेत?
संस्थेचे सदस्य, रुग्ण भारतभर पोहोचले आहे. पण आज त्यांना एकत्र आणणारी कृती घडत नाही. ‘ऑस्टोमी’ ही केवळ सदस्यांना लागणाऱ्या साहित्य खरेदी – विक्री करणारी यंत्रणा नाही; तर ‘ऑस्टोमेट’चे खऱ्या अर्थाने स्वावलंबन झाले पाहिजे. त्यासाठी त्यांना मुख्य प्रवाहात सामील करून घेण्यासाठी आम्ही येत्या कालावधीत विविध प्रकल्प हाती घेणार आहोत. त्याचबरोबर ‘ऑस्टोमी’चे अस्तित्व थेट काश्मिर ते कन्याकुमारीपर्यंत निर्माण करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. देशभरातील १५ हजारांहून अधिक सदस्यांना प्राप्तीकर सवलत मर्यादा विस्तार, सुलभ प्रवास सेवा, आर्थिक पातळीवर सूट यासाठी येत्या कालावधीत राज्य तसेच केंद्र सरकार शिवाय संबंधित यंत्रणांबरोबर पाठपुराव्यासाठी आम्हाला कार्य करायचे आहे.
* गुन्हेगारी प्रवृत्तीच्या माजी मानद सरचिटणीसाने लंपास केलेली १७ लाख रुपयांची रक्कम, पालक संस्था ‘आयसीएस’बरोबर दुरावलेले संबंध, पदावरून हटताच जुन्या कार्यालयीन अधिकारी/सदस्यांच्या वाढलेल्या तक्रारी याबाबत काय?
संस्थेच्या १७ लाख रुपयांचे प्रकरण सध्या आर्थिक तपास विभागाकडे आहे. ते त्वरित निकाली निघून संस्थेची रक्कम मिळविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोतच. पालक संस्था असो किंवा माजी कार्यालयीन अधिकारी, सदस्य त्यांची नाराजी दूर केली जाईल. संस्था गेल्या काही वर्षांत अनेक संकटातून जात आहे. संस्था व तिचे सदस्य यांचे हित प्रथमदर्शनी लक्षात घेतले जाईल.
आरोग्यनिगा, औषध निर्मिती क्षेत्रातील कॉन्व्होटेक, कोलोप्लास्ट, हॉलिस्टर अशा आघाडीच्या विदेशी कंपन्यांची उत्पादने देशव्यापी व्यासपीठाच्या माध्यमातून प्रसंगी माफक दरात लाखो लाभधारकांपर्यंत पोहोचविणाऱ्या ‘ऑस्टोमी असोसिएशन ऑफ इंडिया’च्या मानद सरचिटणीसपदाची धुरा सलग चौथ्यांदा सांभाळणारे शेखर ठाकूर ‘ओएआय’च्या प्रवासाबाबत सांगताहेत झ्र्