इंटरनेट, मोबाइलसारख्या व्यासपीठावरून खासगी बँकांमध्ये सुरू असलेल्या स्पर्धेने तीव्र स्वरूप धारण केले असून आपलेच तंत्रज्ञान अव्वल अशी भूमिका संबंधित बँकांमार्फत घेतली जात आहे. इंटरनेट विरुद्ध मोबाइल असे युद्ध छेडत एचडीएफसी बँकेने तर स्पर्धक आयसीआयसीआय बँकेविरुद्ध थेट दंड थोपटले आहेत.
एचडीएफसी व आयसीआयसीआय बँक या देशातील अनुक्रमे पहिल्या व दुसऱ्या क्रमांकाच्या खासगी बँका आहेत. पैकी आयसीआयसीआय बँकेने गेल्या काही महिन्यांमध्ये फेसबुकचा आधार घेत इंटरनेटवरून होणारे बँकिंग वाढविण्याचा प्रयत्न केला. कोटक महिंद्रनेही असाच काहीसा प्रकार करून बघितला. मात्र एचडीएफसी बँकेने नवे मोबाइल अॅपच जारी करत एक पाऊल टाकत मोबाइल बँकिंग हा नवा अध्याय स्पर्धेत रुजविला.
एवढेच नव्हे तर बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यानेही नुकतेच मोबाइल बँकिंग हे इंटरनेट बँकिंगला मागे टाकेल, असे भाष्य केले. अधिकाऱ्याचे हे वक्तव्य म्हणजे अप्रत्यक्षरीत्या कट्टर स्पर्धक आयसीआयसीआय बँकेला दिलेले आव्हानच मानले जात आहे. कॉम्प्युटर अथवा लॅपटॉपद्वारे हाताळले जाणारे इंटरनेट बँकिंग माध्यम हे टॅब अथवा स्मार्टफोनच्या सहज उपलब्धततेमुळे मोबाइल बँकिंगच्या तुलनेत किचकट असल्याचेही नमूद केले गेले आहे.
रिझव्र्ह बँकेच्या आकडेवारीनुसार, एप्रिल २०१५ मध्ये इंटरनेट बँकिंगद्वारे ६ लाख कोटी तर मोबाइल बँकिंगद्वारे अवघे १८,८६२ कोटी रुपयांचे व्यवहार झाले आहेत. मात्र मोबाइल बँकिंगद्वारे होणाऱ्या व्यवहारांची मात्रा वार्षिक तुलनेत तब्बल पाच पटीने वाढली आहे. एप्रिल २०१४ मध्ये ३,२९६ कोटी रुपयांचे व्यवहार याद्वारे झाले. तर याच व्यासपीठावर या दरम्यानचे व्यवहारही १० लाखांवरून १.९ कोटींवर गेले आहेत.
एचडीएफसी बँकेच्या डिजिटल बँकिंगचे प्रमुख नितीन चुग यांनीही बँकेच्या एकूण व्यवहारांपैकी ६३ टक्के व्यवहार हे मोबाइल व इंटरनेटवरून होत असल्याचे सांगितले. दशकापूर्वीच्या तुलनेत यंदा हे प्रमाण १३ टक्क्यांनी वाढल्याचे ते म्हणाले.
आतापर्यंत विविध ३० बँकांनी स्वत:चे अॅप जारी केले आहेत. त्यावर १७५ हून अधिक सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा