स्मार्टफोनच्या वाढत्या वापरामुळे वाढणाऱ्या ई-कॉमर्स व्यवहारांचा मोह दालन साखळी चालविणाऱ्या बडय़ा रिटेल कंपन्यांनाही आवरता आलेला नाही. परिणामी अनेक आघाडीच्या रिटेल नाममुद्राही आता माहिती तंत्रज्ञानाच्या या नव्या व्यासपीठावर अवतरत आहेत. यापूर्वी आपल्या संकेतस्थळावर केवळ उत्पादने, दालने तसेच कंपन्यांची माहिती अद्ययावत करणाऱ्या या कंपन्यांनी आता इतरांच्या आघाडीच्या ई-कॉमर्स संकेतस्थळांवर उत्पादने विकतानाच स्वत:च्या संकेतस्थळांच्या माध्यमातून थेट उत्पादन विक्रीचे व्यवहारही सुरू केले आहेत. प्रत्यक्ष दालन हाताळणीचा खर्च पाहता ई-व्यापाराद्वारे वस्तुविक्रीतून सेवा कर तसेच वस्तू कराचीही बचत होत असल्याचे यामागे रिटेल कंपन्यांचे गणित आहे. २०१३ मध्ये ८८ टक्के वाढ राखणाऱ्या भारतीय ई-कॉमर्स बाजारपेठ वर्षभरात ६ अब्ज डॉलरची होण्याचा अंदाज आहे. सध्याच्या सणोत्सवात होणारी अधिकची खरेदी लक्षात घेत कंपन्यांनी तर यावर जोरच दिला आहे. शिवाय सरकारी कंपन्याही खासगी कंपन्यांच्या भागीदारीसह हा नवा मार्ग अनुसरत आहेत. येत्या आठवडय़ात सुरू होणाऱ्या दिवाळीच्या पाश्र्वभूमीवर अशाच काही नव्या ई-घडामोडींची येथे माहिती देत आहोत –
३० हजारांत नोंदणीची टाटाची सुविधा
ल्ल माफक दरातील घरांच्या निर्मितीत चार वर्षांपूर्वी उतरलेल्या टाटा व्हॅल्यू होम्सने स्वत:च्या http://www.kaypay.com या संकेतस्थळावर घरांसाठीची नोंदणी सुरू केली आहे. यानुसार कंपनीने देशातील प्रमुख सात शहरांतील तिच्या विविध प्रकल्पांची खरेदी करण्याची संधी देऊ केली आहे. २९.९० ते ५९.९० लाख रुपयांच्या या घरांसाठी ३० हजार रुपये नोंदणी आवश्यक आहे. टाटा व्हॅल्यू होम्सने याचसाठी यापूर्वी स्नॅपडिलबरोबरही व्यवहार केला होता. मात्र अन्य ई-कॉमर्सच्या माध्यमातून ३ ते ५ दिवसांत ५५ हून अधिक घरे विकली गेल्याचे आमच्या लक्षात आल्यानंतर आम्ही आता एकूण विक्रीपैकी ४० ते ४५ टक्के घरे स्वत:च्या व्यासपीठावरून विकू शकतो, असा विश्वास टाटा हाऊसिंगचे व्यवस्थापकीय संचालक ब्रोतिन बॅनर्जी यांनी व्यक्त केला.
सोने-चांदीचीही संकेतस्थळावर खरेदी
ल्ल सणांच्या निमित्ताने होणारी मौल्यवान धातूंची वाढती खरेदी लक्षात घेत सोने तसेच चांदीची नाणी तसेच बार बुलियन इंडियाने आपल्या www.BullionIndia.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली आहे. विविध वजनांतील व शुद्धतेचे धातू कंपनीच्या या व्यासपीठावर अन्य ई-कॉमर्सपेक्षा ५ ते ८ टक्क्य़ांनी कमी मिळतील, असा दावा रिद्धी सिद्धी बुलियन्सचे संचालक केतन कोठारी यांनी केला आहे.
फेसबुकद्वारे निधी हस्तांतरण
ल्ल ई-कॉमर्स तसेच सोशल नेटवर्किंगचा वाढता वापर लक्षात घेत खासगी क्षेत्रातील कोटक महिंद्रा बँकेने अनोखा प्रकार वित्तीय क्षेत्रात अस्तित्वात आणला आहे. केपे ही योजना सादर करत बँकेने फेसबुकच्या व्यासपीठावर निधी हस्तांतरणाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या व्यवहारासाठी फेसबुक यूजर आयडी व पासवर्ड तसेच वन टाइम पासवर्डची गरज भासणार आहे. नेट बँकिंग तसेच खाते क्रमांक नसतानाही http://www.kaypay.com याद्वारे पैसे पाठविता येणार आहेत. केपेद्वारे देशभरातील २५ कोटी बँक खातेधारक जोडले गेले असून फेसबुकच्या माध्यमातून त्यांच्यात पैशाच्या देवाणघेवाणीचे व्यवहार होऊ शकणार आहेत.
बिबा पोशाखही संकेतस्थळावर
महिलांच्या पोशाखासाठी ओळखली जाणारी बिबा हीदेखील आघाडीची नाममुद्रा. तयार कपडे बनविण्याचा मीना बिंद्रा यांनी १९८० च्या दशकात ८,००० रुपयांसह आपल्या घरातून सुरू केलेल्या या व्यवसायाच्या माध्यमातून बिबाचे पोशाख ६५ शहरांतील १५५ दालनांमध्ये उपलब्ध आहेत. मात्र ई-कॉमर्सची ‘क्रेझ’ लक्षात घेत ६६६.्रुुं.्रल्ल या संकेतस्थळावर कंपनीचे पोशाख विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. येथे आता लहान मुलींसाठीचे पोशाखही उपलब्ध असल्याचे कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक सिद्धार्थ बिंद्रा यांनी सांगितले.
रुपे कार्डवर रेल्वेची तिकिटे
व्हिसा तसेच मास्टरकार्डसारखेच रुपे हे स्थानिक स्वरूपातील कार्ड आहे. त्याचा उपयोग करून आता रेल्वेच्या तिकिटासाठीही नोंदणी करता येणार आहे. त्याचबरोबर या कार्डवर एलआयसीचा विमा, फ्लिपकार्ट-स्नॅपडिल-होमशॉप१८ तसेच बुकमायशो डॉट कॉमवरील खरेदीही रुपेमार्फत करता येणार आहे. आयआरसीटीसीद्वारे यापूर्वी केवळ मास्टर व व्हिसा कार्डद्वारेच तिकिटे आरक्षित करण्याची सुविधा होती.
नव्या ‘ई-पेठे’चा मोह कंपन्यांना आवरेना!
स्मार्टफोनच्या वाढत्या वापरामुळे वाढणाऱ्या ई-कॉमर्स व्यवहारांचा मोह दालन साखळी चालविणाऱ्या बडय़ा रिटेल कंपन्यांनाही आवरता आलेला नाही.
First published on: 18-10-2014 at 04:55 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: New e commerce in retail companies