गेल्या अनेक महिन्यांपासूनचे थकीत वेतनाबाबत कसलीही हमी नसलेले तसेच बँकांची कोटय़वधींची देणी याबाबत कोणताही उल्लेख नसणारे पत्र विजय मल्ल्या यांनी किंगफिशरच्या कर्मचाऱ्यांना गुरुवारी धाडले; काही विमानांच्या आधारे व्यवसाय नव्याने सुरू करण्याबाबत नागरी हवाई महासंचालनालयाला योजना सादर करण्यात आली आहे इतकेच ते सूचित करणारे आहे.
२०१२ च्या अखेरीस उड्डाण परवान्याचीही मुदत संपल्यानंतरही किंगफिशर एअरलाईन्स कंपनीकडून काहीही हालचाल होत नसल्याबद्दल न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याचा निर्णय कर्मचारी संघटनेने कालच जाहीर केला होता. तो थोपवून धरण्याचा प्रयत्न म्हणून मल्ल्या यांनी आज कर्मचाऱ्यांना उद्देशून पत्र लिहिले आणि व्यवसाय पुन्हा सुरू करण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे मोघम नमूद केले. कंपनीबद्दल माध्यमांमध्ये नकारात्मक मत येत असल्याने कर्मचाऱ्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांभाळून बोलावे, असे आवर्जून आवाहन पत्रात करण्यात आले आहे. मल्ल्या म्हणतात की, कंपनीचा व्यवसाय पुन्हा सुरू करण्याबाबत नागरी हवाई महासंचालनालयाकडे दोन भागांमध्ये योजना सादर करण्यात आली आहे. यानुसार, सध्याच्या ७ विमानांद्वारे वाहतूक सेवा सुरू करून येत्या चार महिन्यात ती २१ विमानांपर्यंत नेण्याचा विचार आहे; तर दुसऱ्या भागात वर्षभरात पुनर्बाधणीच्या सहाय्याने ५७ विमानांद्वारे हवाई सेवा सुरू करण्यात येईल. रु. ८,००० कोटींचे नुकसान व रु. ७,५२४ कोटींचे कर्ज डोईवर असणाऱ्या किंगफिशरची हवाई वाहतूक ऑक्टोबर २०१२ पासून ठप्प आहे. दरम्यान कंपनीचा उड्डाण परवानाही रद्द झाला आहे. मेपासून कर्मचाऱ्यांचे वेतन थकले असल्याची साधी दखलही पत्रात नाही.