वर्षांच्या सुरुवातीला महागाईने पुन्हा ५ टक्क्य़ांवर काढलेले डोके व सरत्या वर्षअखेर निम्म्यावर आलेले औद्योगिक उत्पादन यामुळे ‘कुठे आहेत, अच्छे दिन’ अशी प्रतिक्रिया उद्योगांच्या तोंडी उमटू लागली आहे. तर सरकारच्या ताज्या आकडेवारीच्या प्रतीक्षेत व्याजदर कपात टाळणाऱ्या रिझव्र्ह बँकेचाही यामुळे हिरमोड झाल्याचे चित्र आहे.
नव्या मोजपट्टीवर आधारित जारी झालेला जानेवारी २०१५ मधील महागाई दर हा ५.११ टक्के नोंदला गेला आहे. डिसेंबर २०१४ मध्ये जुन्या सूत्रानुसार तो ६.०६, तर नव्यानुसार तो ४.२८ टक्के आहे. या दोहोंच्या मध्यात यंदाचा महागाई दर असला, तरी त्याचे पाच टक्क्य़ांवर राहणे अर्थव्यवस्थेत चिंता वाढविणारे ठरले आहे. २०१४च्या अखेरच्या महिन्यात भाज्या, फळे यासारख्या खाद्यान्याच्या किमती वाढल्याने ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित महागाई दर २०१० नंतर पुन्हा ५ टक्क्य़ांवर गेला आहे. जानेवारी २०१४ मध्ये अन्नधान्याच्या महागाईचा दर ६.१३ टक्के राहिला आहे.
केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाने वर्ष २०१२ वर आधारित नवा महागाई दर गुरुवारी उशिरा जाहीर केला. यापूर्वी महागाईची मोजपट्टी २०१० मध्ये बदलण्यात आली होती. मुख्य सांख्यिकी टी. सी. ए. अनंत यांनी मात्र आधीच्या आर्थिक वर्षांच्या तुलनेत २०१४-१५ मधील महागाई दर कमी असेल, असा विश्वास व्यक्त केला आहे.
‘झायफिन रिसर्च’चे अर्थतज्ज्ञ देबोपम चौधरी यांच्या मते, जाहीर झालेला महागाईचा हा दर रिझव्र्ह बँकेला व्याजदर कपात करण्यास पुरेसा आहे, असे मला वाटत नाही.
किरकोळ महागाई दराची ५ टक्क्य़ांपल्याड मजल
वर्षांच्या सुरुवातीला महागाईने पुन्हा ५ टक्क्य़ांवर काढलेले डोके व सरत्या वर्षअखेर निम्म्यावर आलेले औद्योगिक उत्पादन यामुळे ‘कुठे आहेत, अच्छे दिन’ अशी प्रतिक्रिया उद्योगांच्या तोंडी उमटू लागली आहे.
First published on: 13-02-2015 at 05:57 IST
TOPICSजीडीपी
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: New gdp series boosts growth lowers inflation