जगात सार्वत्रिकपणे वापरात आलेला पहिली ‘ई-डाक’ (वेब-मेल) सेवा असलेल्या ‘हॉटमेल’चे संस्थापक सबीर भाटिया यांनी हॉटमेलइतकीच नाव कमावेल असा दावा केलेली, परंतु प्रत्यक्षात फसलेल्या ‘जॅक्स्टर एसएसएम’ या टेक्स्ट मेसेजिंग सेवेनंतर आता त्याच नावाने ग्लोबल सिमकार्ड आणले आहे. या सिमकार्डला मात्र दोन वर्षांत १५ लाख ग्राहक मिळतील, असा त्यांनी विश्वास व्यक्त केला.
आंतरराष्ट्रीय स्तरावर वापरात येणारे परवडणाऱ्या दरातील प्रीपेड धाटणीचे ‘ग्लोबल सिमकार्ड – जॅक्स्टर’ या आपल्या नव्या उपक्रमाचे भाटिया यांनी गुरुवारी मुंबईत अनावरण झाले. योगेश पटेल या नव्या दमाच्या उद्योजकाच्या सोबतीने भाटिया यांनी स्थापित केलेल्या जॅक्स्टर इन्क. या कंपनीने ‘ट्रॅव्हलर्स कॅरिअर’ या ब्रीदासह अमेरिका, कॅनडा, ब्रिटन, मेक्सिको तसेच युरोप आणि आशियातील २०० हून अधिक देशात कुठेही भ्रमंती करणाऱ्यांचा सांगाती या नात्याने हे उत्पादन प्रस्तुत केले आहे.
साध्या फीचर फोनपासून ते अँड्रॉइड, आयफोन, विंडोज फोन आणि ब्लॅकबेरीपर्यंतच्या कोणत्याही हँडसेटवर वापरता येणारे ‘जॅक्स्टर’ हे व्हॉइस, टेक्स्ट आणि डेटा सिमकार्ड आहे. याद्वारे स्थानिक तसेच आंतरराष्ट्रीय कॉल्स आणि एसएमएस आदानप्रदान हे सध्या बाजारात उपलब्ध पर्यायांपेक्षा तब्बल ८५ टक्के स्वस्त दराने शक्य होईल, असे जॅक्स्टर इन्क.चे मुख्याधिकारी व सहसंस्थापक सबीर भाटिया यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
दरसाल दीड कोटी भारतीय विदेशात प्रवासाला जातात. विदेशात असताना दूरसंभाषणासाठी त्यांच्याकडून होणारा सरासरी ५० डॉलरचा खर्च जमेस धरल्यास, ही बाजारपेठ ७५ कोटी डॉलर इतकी असल्याचे म्हणता येईल. जॅक्स्टर सिमची वैशिष्टय़े पाहता पुढील दोन वर्षांत या सेवेसाठी १५ लाख ग्राहक मिळविता येतील, असा विश्वास भाटिया यांनी व्यक्त केला. म्हणजे कंपनीला दोन वर्षांत १० कोटी डॉलरची विक्री उलाढाल गाठता येईल. भारतानंतर चीनमध्ये ही सेवा सुरू करण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा