काही तरी नवे सातत्याने हवे असलेल्या आजच्या पिढीसाठी लहानग्यांना रमण्याचा, अभिव्यक्त होण्याचा आणि माहिती मिळविण्याचा खास सुसंवादी अनुभव देणारे दालन ‘वर्ल्डू’ या नावाने सुरू झाले आहे. डिजिटल मीडिया एजन्सी ‘फोकस’ने ६ ते १२ वर्षे वयोगटाला लक्ष्य करून सुरू केलेल्या या उपक्रमातून डिजिटल अवकाशात या वयोगटाच्या बाजारवर्गाला प्रथमच महत्त्वाचे स्थान मिळणार आहे.
इंटरनेट वापरात लहानग्यांमध्ये दिसून आलेली वाढ आणि त्यासंबंधाने त्यांची अधिकाधिक सहजता पाहता, मुलांना एकाच जागी त्यांच्या आवडीचा सर्व ऐवज प्रदान करताना, शिक्षण व मौजमजा यांचा उत्तम मेळ घालणारा ‘वर्ल्डू’ हा एक आदर्श मंच ठरेल, असा विश्वास फोकस समूहाचे व्यवस्थापकीय संचालक मोनिश घटालिया यांनी सांगितले. वर्ल्डू हे गेमिंगच्याही पलीकडे, सोशल नेटवर्किंगसह मुलांमधील सर्जनशीलता, कल्पनाशक्ती आणि ज्ञानप्राप्तीला प्रोत्साहन देईल. शिवाय दर २०-२५ दिवसांनी यावरील आशय अद्ययावत होत असल्याने वर्ल्डूचा मुलांना कंटाळाही येणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
मिनीक्लिप, गेमबॉक्स, झपॅक (गेम्स), काटरून नेटवर्क, छोटा भीम (कार्टून्स), नॅशनल जिओग्राफिक, जेफकॉर्विन कनेक्ट (प्राणीजगत-पर्यावरण), झी क्यू, वॉर्नर ब्रदर्स, शेमारू, सोनी पिक्चर्स, रिलायन्स बिग फ्लिक्स (मनोरंजन), अमर चित्रकथा, क्रॉसवर्ड्स, लॅण्डमार्क, ड्रीमलॅण्ड, ब्रिटानिका, रॉबिनेज्, चंपक (कॉमिक्स) आणि सेंटोसा यांसारखी आंतरराष्ट्रीय रमणीय स्थळे वगैरेतून ‘वल्र्डू’वर सध्याच्या घडीला ७० टक्के आशय हा बाह्य़ स्रोतांतून मिळविला जाणार आहे. सातत्याने आशय अद्ययावत करीत नेण्याच्या ओघात आगामी काळात हेच प्रमाण ४० टक्क्यांवर आणले जाईल. उल्लेखनीय म्हणजे या मंचावर कोणत्याही जाहिराती अथवा मध्येच डोकावणारे डिजिटल बॅनर्स नसतील.

सध्याच्या घडीला तरी डिजिटल माध्यमांमध्ये लहानग्यांच्या बॅ्रण्ड्स व जाहिराती या दुर्लक्षितच राहिल्या आहेत. किंबहुना किड्स ब्रॅण्ड्सच्या जाहिरातींसाठी तेथे वावच नव्हता. या जाहिरातींसाठी खास प्रेक्षक वर्ग तयार करण्याचा ‘वल्डरू’ हा पहिलाच प्रयत्न आहे. पण जाहिरातीही वेबस्थळाच्या आशयाला बाधा न आणणाऱ्या कल्पक असतील. पहिल्या वर्षांत ‘वर्ल्डू’ला लाखभर नियमित वापरकर्ते लहानग्यांचे पाठबळ मिळेल आणि दोन वर्षांतच आपला हा उपक्रम केलेली गुंतवणूक वसूल करून नफा मिळविताना दिसेल.
– मोनिश घटालिया ‘वर्ल्डू’चे मुख्य प्रवर्तक

शिशू संगोपन बाजारपेठ गाठणार १०९० अब्जांची मजल
संख्येच्या मानाने जगातील अव्वल बाजारपेठेमध्ये मोडणाऱ्या भारतात शिशू व बाल संगोपनासाठी उपयुक्त उत्पादने, खाद्यान्न, डायपर, प्रसाधने, कपडे, पादत्राणे, खेळणी वगैरे बाजारवर्गाची व्याप्ती उत्तरोत्तर वाढत असून ती आगामी २०१५ पर्यंत वार्षिक १७ टक्के दराने वाढून, सध्याच्या ६४७.६ अब्ज रुपयांवरून १०९०.४ अब्ज रुपयांचा स्तर गाठेल, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. आरएनसीओएस आणि यूबीएम इंडिया यांनी संयुक्त सर्वेक्षणानंतर पुढे आणलेल्या अभ्यास अहवालात वरील निष्कर्ष मांडण्यात आला आहे. मुंबईत योजण्यात आलेल्या दक्षिण आशियातील पहिल्या शिशू, बाल आणि माता (सीबीएमई २०१३) प्रदर्शनात हा अहवाल जाहीर करण्यात आला. यूबीएम इंडियाचे कार्यकारी संचालक जोजी जॉर्ज यांच्या मते, भारतीय शिशू व बाल संगोपन ही जगातील एक मोठी लाभदायी बाजारपेठ बनून पुढे येत आहे. देशात या बाजारवर्गाचा वाढीचा दर जगाच्या तुलनेत खूपच अधिक आहे. त्यामुळे येत्या काळात हे सशक्त उद्योगसंधीचे क्षेत्र निश्चितच असेल आणि अनेक आंतरराष्ट्रीय ब्रॅण्ड्सनी भारताच्या दिशेने वाट धरली आहे.

Story img Loader