डॉलरपुढे दिवसेंदिवस अधिक कमकुवत होत जाणाऱ्या रुपयाला सावरण्यासाठी रिझव्‍‌र्ह बँकेने मंगळवारी पुन्हा एकदा उपाययोजना जारी केल्या. यामुळे बँकांमार्फत अर्थव्यवस्थेतील १६,००० कोटी रुपये आणखी कमी होणार आहेत. नव्या निर्णयानुसार, रिझव्‍‌र्ह बँकेने मध्यवर्ती बँकेकडे अन्य व्यापारी बँकांनी ठेवावयाच्या रोख राखीव प्रमाणात ७० टक्क्यांवरून थेट ९९ टक्क्यांपर्यंतची वाढ केली आहे. बँकांना चालू बचत खाते, मुदत ठेवींमार्फत जमा केलेल्या एकूण रकमेच्या ४ टक्के रक्कम रिझव्‍‌र्ह बँकेकडे ठेवणे बंधनकारक आहे. बँका सप्ताहअखेरच्या दिवशी एकूण रकमेच्या सरासरी ७० टक्के रिझव्‍‌र्ह बँकेकडे ठेवतात. या प्रक्रियेला ‘रिपोर्टिग फ्रायडे’ असे म्हटले जाते. ही मुभा आता काढून घेत आता बँकांना दररोज ९९ टक्के रक्कम राखण्याची सक्ती करण्यात आली आहे. यामुळे अर्थव्यवस्थेतील दैनंदिन चलनातून १६,००० कोटी रुपये कमी होणार आहेत. याचप्रमाणे बँकांना त्यांच्या एकूण दायित्वाच्या अर्धा टक्का रक्कम रिझव्‍‌र्ह बँकेकडून रोखता सहकार्य सवलतीद्वारे प्राप्त होणार आहे. नव्या निर्णयांची अंमलबजावणी तातडीने होणार असून पुढील निर्णय होईपर्यंत ते कायम असतील, असेही रिझव्‍‌र्ह बँकेने स्पष्ट केले आहे.