रिलायन्स इंडस्ट्रीजने तिच्या केजी-डी६ खोऱ्यातील नैसर्गिक वायूच्या खरेदीदार कंपन्यांना १ एप्रिलपासूनच पुरवठा केलेल्या वायूची नवीन सूत्रानुसार किंमत लागू झाल्याचे आज पुन्हा एकदा सूचित करणारे पत्र धाडले. निवडणूक आचारसंहितेपायी वायूच्या दरात जवळपास दुपटीने वाढ करणाऱ्या निर्णयाची अंमलबजावणी रखडली आणि रिलायन्सला या काळात जुन्याच मुदत संपलेल्या कराराप्रमाणे ठरलेल्या किमतीने वायूपुरवठा सुरू ठेवणे भाग पडले होते.
युरिया खत उत्पादक कंपन्यांना पाठविलेल्या एक पानी पत्रात, रिलायन्स इंडस्ट्रीजने १ एप्रिल २०१४ पासून दर दिवशी १२.५ दशलक्ष घनमीटर या प्रमाणात झालेला वायूपुरवठा हा तात्पुरता ४.२०५ अमेरिकी डॉलर प्रति युनिट या किमतीला केला गेल्याचे सांगितले. तथापि नवीन वाढलेल्या किमतीला सरकार जेव्हा मंजुरी देईल तेव्हा या दोन किमतीतील तफावतीची वसुली केली जाईल, असेही स्पष्ट स्वरूपात सूचित केले आहे. देशांतर्गत उत्पादित नैसर्गिक वायूच्या किमती या १ एप्रिल २०१४ पासून रंगराजन समितीने शिफारस केलेल्या नवीन सूत्राप्रमाणे लागू होतील, असा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने गेल्या वर्षी घेतला आणि नवीन किंमत सूत्राविषयी १ जानेवारी २०१४ला अधिसूचना निघाली आणि १७ जानेवारीला ती भारत सरकारच्या राजपत्रात प्रसिद्धही करण्यात आली. नवीन किंमत सूत्रानुसार, नैसर्गिक वायूची किंमत ही प्रति युनिट ८.३ अमेरिकी डॉलरच्या घरात जाणारी असेल, असेही स्पष्ट करण्यात आले.
तथापि लोकसभा निवडणुका सुरू असेपर्यंत नवीन किमतीची अंमलबजावणी लांबणीवर टाकण्याचे निवडणूक आयोगाने सरकारला आदेश दिले. त्यामुळे रिलायन्ससह अन्य वायू उत्पादकांना जुन्याच दराने पुरवठा सुरू ठेवणे क्रमप्राप्त ठरले.
खत कंपन्यांनी ज्या अर्थी केजी-डी६ मधून वायू मिळविला, त्या अर्थी त्यांनी प्रति युनिट ४.२०५ डॉलर किमतीने होणाऱ्या पुरवठय़ाचा करार हा ३१ मार्च २०१४ रोजी संपुष्टात आला आणि नवीन किंमत ही १ एप्रिलपासून लागू होईल याला मान्यता दिली, असाच अर्थ निघतो असेही रिलायन्सच्या पत्रात नमूद करण्यात आले आहे. सरकारने स्वत:हून नवीन किंमत ठरवून तिला मंजुरी द्यावी अथवा लवादामार्फत किमतीबाबत जो निर्णय होईल त्यानुसार या जुन्या किमतीतील फरकाची रक्कम चुकती करण्याचे खत कंपन्यांना तिने कळविले आहे. रिलायन्स, बीपी पीएलसी या सहयोगी कंपनीने सरकारकडून नवीन किमतीच्या अंमलबजावणीस होणाऱ्या विलंबाबाबत सरकारला लवादाची नोटीस देण्यात आल्याचाही उल्लेख या पत्रात केला गेला आहे. ‘होणारा वायूपुरवठा नाकारण्याचा तुमच्यापुढे (खत कंपन्यांपुढे) पर्याय आहे, पण जर तुम्ही वायूपुरवठा पूर्ववत सुरू ठेवला आहे, त्या अर्थी तुम्हाला वरील शर्ती मान्य आहेत,’ असा रिलायन्सने त्यांच्यापुढे पेच निर्माण केला आहे.