जर्मनीच्या क्रिसलरबरोबर ‘जीप’साठी व्यावसायिक भागीदारी करताना फियाटने वाहन विक्री-विपणासाठी असलेले टाटा मोटर्सबरोबरचे सहकार्य मर्यादित केले आहे. यासाठी फियाटने क्रिसलरबरोबर नव्या उपकंपनीच्या व्यासपीठावर वाहने बाजारात आणण्याचे निश्चित केले आहे. याअंतर्गत २०१३ मध्ये स्वतंत्र विक्री केंद्रेही सुरू करण्यात येणार आहेत. त्यांची संख्या १२० असेल तर यासाठी नवीन १०० कर्मचारी भरतीही करण्यात येणार आहे.
क्रिसलरबरोबरची व्यावसायिक भागीदारी ही फियाटसाठी पुन्हा भारतीय वाहन बाजारपेठेत आघाडीचे स्थान मिळविण्यासाठी केली असल्याचे फियाट ग्रुप ऑटोमोबाईल्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक एनरिको एटानासिओ यांनी गुरुवारी मुंबईत म्हटले. कंपनी पुन्टो आणि लिनियाची नवी आवृत्तीही लवकरच सादर करणार आहे.
फियाट-टाटा भागीदारीतून सध्या फियाटच्या लिनिया आणि पुन्टो या अनुक्रमे सेदान आणि हॅचबॅक कार तयार केल्या जातात. त्यांची विक्रीही मार्च २०१२ मध्ये अस्तित्वात आलेल्या या उपकंपनीद्वारे केली जाते.
आता याच व्यासपीठावर क्रिसलरच्या वाहनांचीही विक्री होणार असल्याने फियाट-टाटा वाहन निर्मिती तसेच विक्री भागीदारीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
टाटाने यापूर्वीच फियाटबरोबरची विक्री व्यवस्थेसाठीची भागीदारी संपुष्टात येत असल्याची घोषणा केली होती. डिझेल इंजिन पुरवठय़ाबाबत फियाट आणि मारुती सुझुकी यांच्यात याच वर्षांत सहकार्य करार झाल्यानंतर टाटाने फियाटबरोबरच्या भागीदारीला पूर्णविराम दर्शविला होता. २०१३ मधील स्थिती काय आहे, याबाबत अद्यापही अस्पष्टता आहे.