विप्रो समूहातील ग्राहकोपयोगी वस्तू व्यवसायाने गेल्या तिमाहीत तिच्या अखत्यारित असणाऱ्या संतूर, यार्डले आदी ब्रॅण्डच्या जोरावर १७ टक्क्यांची महसुलातील वाढ नोंदविली असली तरी कंपनीमार्फत गेल्या काही कालावधीत नव्या उत्पादनांची भर पडल्याने सध्याच्या बिकट अर्थव्यवस्थेत सलग तिमाहीतील वाढ उल्लेखनीय राहिली आहे.
विप्रो समूहातील ग्राहकोपयोगी वस्तू विभागाने ऑक्टोबर ते डिसेंबर २०१२ दरम्यान १,०२८ कोटी रुपयांचा महसुल जमा केला आहे. तो आधीच्या तुलनेत १८ टक्क्यांनी यंदा अधिक आहे.
महसुलाच्या तुलनेत कंपनीचे चलित उत्पन्नही या कालावधीत १४ टक्क्यांनी उंचावले आहे. या व्यवसायात कंपनीच्या लाईट तसेच फर्निचर या वस्तूच्या निर्मितीचा समावेश होतो.
याबाबत कंपनीच्या या व्यवसाय विभागेचा प्रमुख पराग कुलकर्णी यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले की, कंपनीचा संतूर हा साबण सध्या देशपातळीवर तिसरा मोठा ब्रॅण्ड आहे. तर महाराष्ट्र, गुजरातसारख्या भागात तो अद्यापही क्रमांक एकवर आहे. सुमारे १,००० कोटी रुपयांचा हा ब्रॅण्ड गेल्या तिमाहीतही १४ टक्क्यांनी वधारला आहे. यार्डलेने याच कालावधीत ३९ टक्के वाढ नोंदविली आहे. तर लाईट (एलईडी वाढ ५० टक्के) आणि फर्निचर व्यवसाय क्षेत्रात नव-नवी उत्पादने सादर करण्यात आल्याचा चांगला लाभ बिकट अर्थव्यवस्थेतही कंपनीला झाला आहे. सध्याचे गुंतवणूकपूरक वातावरण नसल्याने गृहनिर्माण, व्यावसायिक पातळीवर संथ हालचाल असूनही कंपनीने एलईडी, ग्रीन लाईटसारख्या उत्पादनांवर अधिक भर दिल्याचा फायदा कंपनीला झाला आहे. फर्निचर व्यवसायाने तर या दरम्यान दुहेरी आकडय़ातील वाढ राखली आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावरही कंपनीने इंडोनेशियात २६ टक्के, चीनमध्ये ३२ टक्के, मध्य पूर्वेत ३२ टक्के तर व्हिएतनामध्ये २४ टक्के वाढ नोंदविली आहे. सनफ्लॉवर वनस्पती तेल व्यवसायातून बाहेर पडणाऱ्या विप्रोने नुकतीच एलडी व्ॉक्ससन कंपनी ताब्यात घेतली होती. या माध्यमातून सिंगापूर, मलेशिया, चीन, तैवान देशांमध्ये कंपनीला त्वचानिगा उत्पादन निर्मितीत शिरकाव करता आला.
निकाल आणि प्रतिसाद..
* विप्रो घसरला
तिसऱ्या तिमाहीत १८ टक्क्यांची नफ्यातील वाढ नोंदविणाऱ्या देशातील तिसऱ्या मोठय़ा विप्रो या माहिती तंत्रज्ञान कंपनीच्या समभागाचे मूल्य मात्र सकाळच्या सत्रातच ५.४ टक्क्यांनी खाली आले होते. एवढेच नव्हे तर हा समभाग यावेळी ‘सेन्सेक्स’मधील सर्वाधिक नुकसानदायक समभागांमध्ये आघाडीवर होता. दिवसअखेर तो ८ टक्क्यांनी घसरला. यामुळे कंपनीचे बाजारमूल्य ८,३६४ कोटी रुपयांनी खालावले. कंपनीचा आगामी विकास फारसा आशादायक नसल्याच्या चिंतेने कंपनीच्या समभागावर परिणाम झाला.
*  रिलायन्स नाममात्र भर
शुक्रवारी उशिरा वित्तीय निकाल जाहीर करणाऱ्या रिलायन्सचा समभाग व्यवहाराखेर अवघ्या १.०५ टक्क्यांनी वधारला होता. रिलायन्स कंपनी कालच्या सत्रात एकूण बाजारमूल्यांमध्ये काहीशी मागे पडल्याने आयटीसीला आघाडी घेता आली. दरम्यान, रिलायन्सने गेल्या तिमाहीत २४ टक्क्यांची वाढ जाहीर केली आहे. ९३,८८६ कोटी रुपयांच्या विक्रीच्या तुलनेत समूहाला ५,५०२ कोटी रुपयांचा नफा झाला.
* हीरो आपटला
ताज्या वित्तीय निष्कर्षांत २० टक्क्यांहून अधिक नफ्यातील घट राखणाऱ्या हीरो मोटोकॉर्पचा समभागही व्यवहाराच्या सुरुवातीला ५.४ टक्क्यांनी घसरला होता. कंपनीने सलग दुसऱ्या तिमाहीत घसरता नफा राखला आहे.
*  एचडीएफसी नरम
खाजगी वित्त क्षेत्रातील एचडीएफसीचीही हिच अवस्था सकाळच्या सत्रात होती. कंपनीने तिमाहीत ३० टक्क्यांच्या नफ्याची कामगिरी बजावूनही समभाग मूल्य मात्र यावेळी १.१ टक्क्यांनी घसरले होते. कंपनीचा समभाग यावेळी ६५९.१० रुपयांवर प्रवास करत होता. व्यवहाराखेरिस तोही ०.६३ टक्क्यांनी घसरता राहिला.

Story img Loader