पुढील तीन महिन्यांत नव्याने भरती करण्याबाबत भारतातील मालकवर्गाने सावध आशावाद व्यक्त केला असला, तरी रोजगार मिळविण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या बेरोजगारांना त्यासाठी अधिक कडक निवड प्रक्रियेला सामोरे जावे लागणार असल्याचे संकेत ‘मॅनपॉवर’ या कंपनीने दिले आहेत.
एप्रिल-जून या महिन्यांत मनुष्यबळ वाढविण्याचे २७ टक्के मालकवर्गाने ठरविले असून, त्यामध्ये प्रामुख्याने माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचा समावेश आहे, असे मॅनपॉवरच्या सर्वेक्षणात म्हटले आहे. वर्षांच्या पहिल्या तिमाहीपेक्षा दुसऱ्या तिमाहीत भरतीच्या प्रक्रियेत दोन टक्क्य़ांनी सुधारणा झाल्याचे दिसत असले तरी वर्षांच्या तुलनेत १९ टक्क्य़ांची घट झाल्याचेही म्हटले आहे. गेल्या वर्षी हे प्रमाण ४५ टक्के इतके होते. मंदीचा सूर असला आणि भारतात आर्थिक व राजकीय वातावरणात अनिश्चितता असली तरी मालकवर्गाला सर्व क्षेत्रांत रोजगाराच्या संधी निर्माण करण्याची सकारात्मक इच्छा आहे, असे मॅनपॉवर समूहाचे व्यवस्थापकीय संचालक ए. जी. राव यांनी म्हटले आहे. उमेदवारांना कलपरीक्षण चाचणी अथवा एकापेक्षा अधिक वेळा मुलाखतीला सामोरे जावे लागणार आहे, असा इशाराही राव यांनी दिला आहे. परिवहन आणि कंपनी क्षेत्रात रोजगाराच्या अधिक संधी उपलब्ध होणार असून जवळपास ३७ टक्क्य़ांपर्यंत रोजगाराच्या संधी मिळण्याची शक्यता आहे. सेवाक्षेत्र आणि घाऊक व किरकोळ व्यापार क्षेत्रात ३२ टक्के संधी उपलब्ध होणार आहेत.
देशातील जवळपास ५३७० मालकवर्गाचे सर्वेक्षण केले असता रोजगाराच्या संधी निर्माण करण्याचा वेग कमी असल्याचे आढळले आहे. तथापि, पुढील तीन महिन्यांत कोणत्याही क्षेत्रातील मनुष्यबळ कमी करण्यात येणार नसल्याचेही संकेत मिळत आहेत. देशातील चारही विभागांत भरतीबाबत सकारात्मक संकेत मिळत असून त्याचे सर्वाधिक प्रमाण उत्तरेकडे आहे. तेथे ३६ टक्के भरती करण्यात येणार असून त्यापाठोपाठ पश्चिमेकडे ३२ टक्के, दक्षिणेकडे २१ टक्के, तर सर्वात कमी प्रमाण १५ टक्के पूर्वेकडे आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा