जागतिक बाजारात दखलपात्र ठरायच्या झाल्यास भारतीय बँकांना आधुनिकीकरण आणि अद्ययावतपणा अंगिकारावा लागेल. सर्व प्रकारच्या ग्राहकांसाठी तसेच एकंदर आपल्या कार्यपद्धती व प्रक्रियांसाठी आधुनिक तंत्रज्ञानाघारीत सेवा व उपाययोजना अंगिकारल्या गेल्या तर बँकांना जगाच्या बरोबरीने वाटचाल करता येईल, असे प्रतिपादन पंतप्रधानाचे आर्थिक सल्लागार सी. रंगराजन यांनी गुरुवारी ‘आयबेक्स इंडिया २०१३’च्या उद्घाटनप्रसंगी बोलताना केले. बँकांमध्ये वापरात येणारे तंत्रज्ञान व आधुनिक उपकरण व प्रणालींना वाहिलेले ‘आयबेक्स’ प्रदर्शन व परिषदेचे हे दुसरे पर्व असून, वांद्रे-कुर्ला संकुलात ते शनिवार १९ जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहे. ‘आयबेक्स’सारखे उपक्रम हे भारतीय बँकांकडून अपेक्षित असलेल्या निस्सीम, प्रभावी आणि ग्राहकांप्रती सहजसाध्य सेवा-सुविधा विकसित करण्यास चालना देणारे व्यासपीठ बनून पुढे येत आहेत, असे गौरवोद्गार रंगराजन यांनी पुढे बोलताना काढले. बँकांच्या कार्यपद्धतीतील ही आधुनिकता ही काळाची गरज बनली असून, त्यात येत्या काळात आणखी वेग यायला हवा, असेही त्यांनी परिषदेला उपस्थित बँकिंग क्षेत्रातील बडय़ा दिग्गजांना उद्देशून आवाहन केले. या प्रसंगी व्यासपीठावर नियोजन आयोगाचे सदस्य डॉ. सौमित्र चौधरी, रिझव्‍‌र्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर डॉ. के. सी. चक्रवर्ती व आनंद सिन्हा, आयडीबीआरटीचे संचालक सांबामूर्ती, एनपीसीआयचे मुख्य कार्याधिकारी ए. पी. होता, एनआयबीएमचे संचालक अ‍ॅलन सी. परेरा, सेंट्रल बँकेचे अध्यक्ष एम. व्ही. टांकसाळे, आयडीबीआय बँकेचे अध्यक्ष आर. एम. मल्ला, युनियन बँकेचे अध्यक्ष डी. सरकार आदी मान्यवर उपस्थित होते.