नवी दिल्ली :आघाडीची वाहन निर्माता कंपनी टाटा मोटर्सच्या विद्युत शक्तीवर चालणाऱ्या श्रेणीतील नेक्सॉन ई-व्हीने पेट घेतल्याची घटना नुकतीच मुंबईत घडली. याबाबत कंपनीकडून घटनेची मुळापासून चौकशी करण्यात येत असल्याचे टाटा मोटर्सकडून गुरुवारी सांगण्यात आले.
पेट घेतलेल्या वाहनाची तपासणी केली जात असून तपासणीनंतर त्याबाबत कंपनीकडून माहिती देण्यात येईल, असे टाटा मोटर्सकडून सांगण्यात आले. समाजमाध्यमावर नेक्सॉन ईव्हीने पेट घेतल्याच्या चित्रफितीचा वेगाने प्रसार झाल्यानंतर कंपनीकडून हे स्पष्टीकरण देण्यात आले. टाटा मोटर्सने गेल्या चार वर्षांत ३० हजारांहून अधिक विद्युत वाहने विकली आहेत जी वाहने देशात एकत्रितपणे १० कोटी किलोमीटरहून अधिक धावली आहे. मात्र अशा प्रकारे वाहनाने पेट घेतल्याची ही पहिलीच घटना घडली असल्याचे कंपनीने स्पष्ट केले.
सरकारकडूनही दखल
गेल्या काही दिवसांत विद्युत दुचाकींमध्ये आगी लागण्याच्या घटनेत लक्षणीय वाढ झाली आहे. यासाठी केंद्र सरकारनेदेखील याची दखल घेत आगीच्या घटनांच्या तपासणीसाठी एक मंडळ तयार केले आहे. वाहननिर्मिती कंपन्यांकडून याबाबत निष्काळजीपणा झाल्याचे आढळल्यास दंड करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.