भारतात उशिराने का होईना पण निदान चार महानगरांमधून ‘डिजिटायझेशन’ची प्रक्रिया सुरू झाली असून, यातून आता टीव्ही कार्यक्रमांच्या दरम्यान अधूनमधून येणारे जाहिरांतीचे ब्रेक आणि थेट प्रक्षेपणात पडद्याच्या एका कोनातून डोकावणाऱ्या जाहिरांताना विराम मिळण्याचे संक्रमण प्रत्यक्षात सुरू होऊ घातले आहे. ‘पे टीव्ही’च्या क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या ‘एचबीओ एशिया’ने याची सुरुवात करताना भारतात लवकरच दोन संपूर्ण जाहिरातमुक्त सिनेमा वाहिन्या सुरू करण्याची घोषणा केली आहे. भारताव्यतिरिक्त अन्यत्र सर्वत्र एचबीओ एशियाच्या विविध वाहिन्यांचे प्रसारण हे जाहिरातमुक्त सुरू आहे.
भारतातच नव्हे संपूर्ण दक्षिण आशियाई देशांमध्ये ‘डिजिटायझेशन’ प्रक्रियेतील दिरंगाई आणि केबल प्रसारणातून शुल्कवसुलीत होणारी चोरी या समस्येपायी बीबीसी आणि टर्नरसह अनेक आंतरराष्ट्रीय नेटवर्क्‍सनी काढता पाय घेतला आहे. चालू वर्षांच्या सुरुवातील टर्नरने भारतातील एक हिंदी मनोरंजन वाहिनी बंद केली. पण या प्रवाहाला फाटा देत एचबीओ एशियाने जाहिरातींवर विसंबून न राहता केवळ अधिकाधिक ग्राहक मिळवून वाहिन्या चालविल्या
जाऊ शकतात असा देशातील टीव्ही बाजारपेठेविषयी विश्वास दाखविणारे पाऊल टाकले आहे. इरॉस इंटरनॅशनल पीएलसीसह भागीदारीत एचबीओने भारतात ‘एचबीओ डिफाइन्ड’ आणि ‘एचबीओ हिट्स’ या शुल्काधारीत सिनेमा वाहिन्या दाखल केल्या आहेत.
या दोन्ही नव्या वाहिन्या डिजिटल मंचावर दरमहा १०० रु. या शुल्कासह टीव्ही  प्रेक्षकांना पाहता येणार आहेत. एचबीओ डिफाइन्ड ही संपूर्ण इंग्रजी भाषक वाहिनी असेल, तर एचबीओ हिट्सवर हिंदी आणि इंग्रजी असे दोन्ही भाषांमधील चित्रपट प्रसारीत होतील.     
गेल्या दशकभरात भारतातील जाहिरात बाजारपेठेचा विस्फोटक विस्तार झाला आहे हे नि:संशय. पण लोकांची मनोरंजनविषयक धारणाही समृद्ध बनली आहे आणि घरातील आरामदायी वातावरण दर्जेदार मनोरंजनाचा आस्वाद घेण्यासाठी त्यांनी मोठी गुंतवणूकही केली आहे. त्यामुळे अशा प्रेक्षकांचा १०० टक्के जाहिरात-मुक्त चित्रपटांचे प्रसारण पाहण्याचा नैसर्गिक हक्कच ठरतो. आगामी काळात म्हणूनच शुल्काधारीत सेवांकडील हे संक्रमण स्वाभाविकपणे घडून येईल असे दिसते.’
जोनाथन स्पिंक,
मुख्य कार्याधिकारी,
एचबीओ एशिया

चीननंतर भारत जगातील दुसरी मोठी शुल्कधारीत टीव्ही प्रेक्षकांची बाजारपेठ    : ११.७ कोटी कुटुंबे
शुल्कधारीत प्रेक्षकसंख्येत अपेक्षित वार्षिक वाढीचा दर     :    ४ %
भारतात शुल्काधारीत टीव्हीच्या प्रेक्षकसंख्येचे प्रमाण     :    २६%
मलेशिया, ऑस्ट्रेलिया, हाँगकाँग, सिंगापूर, इंडोनेशिया, न्यूझीलंडमध्ये हेच प्रमाण     :    १००%

Story img Loader