राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी मंगळवारी नव्या सर्वोच्च स्थानावर आरूढ झाला. ८,३५० पुढील कामगिरी बजाविताना तो थेट ८,३६२.६५ पर्यंत गेला. सोमवारचा ऐतिहासिक टप्पा त्याने अवघ्या एकाच सत्रात मोडीत काढला. उलट तेजी नोंदवूनही सर्वोच्च टप्प्यापासून लांब राहण्याची मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सची खेळी भांडवली बाजाराने सलग दुसऱ्या व्यवहारात अनुभवली. बाजारात वध-घटीचे हिंदोळे सुरू असून, खरेदी आणि विक्री दोन्ही बाजूंनी चढाओढ वाढली असल्याचे आढळून येते.
१८.४० अंश वाढीसह निफ्टी ८,३६२.६५ वर बंद झाला. व्यवहारात ८,३७८.७० ते ८,३२१.८५ असा प्रवास राखणाऱ्या राष्ट्रीय शेअर बाजाराच्या या प्रमुख निर्देशांकाने सलग दुसऱ्या सत्रात नवा विक्रमी स्तर गाठला. तर ३५.३३ अंश वधारणेसह सेन्सेक्स दिवसअखेर २७,९११.२५ पर्यंतच पोहोचू शकला. २८ हजार पार करण्यात अपयश आलेल्या सेन्सेक्सने ५ नोव्हेंबरच्या २७,९१५.८८ पासूनही लांब राहणेच पसंत केले.
सेन्सेक्सचे सोमवारच्या तेजीनंतर दुसऱ्या दिवशीचे व्यवहार तेजीसहच सुरू झाले. याच वेळी मुंबई निर्देशांक २८ हजाराच्या उंबरठय़ावर गेला. २७,९९६.९२ हा टप्पा गाठल्यानंतर मात्र सेन्सेक्स नरमला. त्याला सत्रअखेपर्यंत २८ हजार गाठणे तर शक्य झालेच नाही. शिवाय व्यवहाराच्या सुरुवातीचाच त्याचा टप्पा सत्रातील सर्वोच्च राहिला.
देशातील औद्योगिक उत्पादन दर तसेच ग्राहक किंमत निर्देशांकाची आकडेवारी जाहीर होण्यास दिवसाचाच अवधी असताना भांडवली बाजारात आठवडय़ातील दुसऱ्या सत्रात व्याजदराशी निगडित क्षेत्रातील समभागांमध्ये मूल्यवाढ नोंदली गेली. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर आता प्रति पिंप ८२ डॉलपर्यंत येऊन विसावल्याचेही स्वागत बाजारात झाले.
सेन्सेक्समधील निम्मे समभाग तेजीत तर शेवटच्या व्यवहारातील नफेखोरीमुळे निम्मे समभाग घसरणीत राहिले. बँक, पोलाद, वाहन, ऊर्जा क्षेत्रांतील समभाग अर्थातच तेजीत होते. क्षेत्रीय निर्देशांकामध्ये स्थावर मालमत्ता एक टक्क्याने उंचावला होता. मिड व स्मॉल कॅपमध्येही अनुक्रमे ०.७२ व ०.२४ टक्के वाढ राखली गेली.
22