जवळपास ८०० अंशांच्या घसरणीने ‘ब्लॅक फ्रायडे’ झाल्यानंतरही भांडवली बाजार ‘मॅनिक मंडे’ अनुभवता झाला. मुंबईसह राष्ट्रीय शेअर बाजारातील मोठी घसरण सलग दुसऱ्या व्यवहारातही कायम राहिली. डॉलरच्या तुलनेत स्थानिक चलनाचा प्रवास कायम रसातळाला जाणारा पाहून गुंतवणूकदारांनी समभाग विक्रीचा मारा नव्या आठवडय़ाच्या पहिल्या दिवशीही सुरू ठेवला. दिवसाची सुरुवात ६२ पासून अखेर ६३ पर्यंत नोंदविणाऱ्या रुपयामुळे सेन्सेक्सही दिवसअखेर चार महिन्याच्या तळात शिरला. २९१ अंश घसणीसह मुंबई निर्देशांक आता १८,३०० वर येऊन ठेपला आहे. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीने सोमवारी ५,५०० चा स्तर सोडताना दिवसअखेर शतकानजीकची घसरण नोंदविली.
प्रमुख बाजार आता गेल्या जवळपास वर्षांच्या नीचांक पातळीवर विसावले आहेत. सप्टेंबर २०१२ नंतर प्रमुख भांडवली बाजाराची स्थिती आजच्या पातळीवर पोहोचली आहे. ७६९ अंशांच्या रुपाने चार वर्षांतील ७६९ अंशांची सुमार घसरण शुक्रवारी नोंदविल्यानंतर भांडवली बाजारातील व्यवहाराची नव्या सप्ताहाची सुरुवातही नरमच झाली. २२२ अंशांने घसरणारा मुंबई निर्देशांक यावेळी १८,३७६ पर्यंत खाली आला होता. उत्तरोत्तर ही घट विस्तारत गेली. सकाळच्या सत्रातच डॉलरच्या तुलनेत ६२ पर्यंत व दुपापर्यंत ६३ पर्यंत घसरणाऱ्या रुपयाची धास्ती गुंतवणूकदारांनी घेत बँक, वाहन, औषध निर्मिती अशा क्षेत्रीय निर्देशांकांमधील समभागांची विक्री केली. बजाज ऑटो, भारती एअरटेल, आयसीआयसीआय बँकसारख्या समभागांचे मूल्य घसरले. भांडवली बाजारातून विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांचा निधी काढून घेण्याचे पर्व कायम राहिल्याने सोमवारी त्याचे पर्यावसान एक लाख कोटी रुपयांची मालमत्ता कमी होण्यात झाले. शुक्रवारच्या चार वर्षांतील मोठय़ा निर्देशांक आपटीने विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी ५६३.२३ कोटी रुपयांचे समभाग विकले होते. आशियाई बाजारातील अनेक निर्देशांकही सलग तिसऱ्या सत्रात नकारात्मक कामगिरी बजावत होते. तर युरोपीय बाजारांमध्येही फारसे समाधानकारक वातावरण नव्हते. सेन्सेक्सच्या दफ्तरी २६३ कंपन्यांच्या समभागांनी वर्षभराचा नीचांक गाठला.
* सोने ३२ हजार, तर चांदी ५२ हजाराकडे..
तोळ्याला शनिवारीच ३१ हजारी दर गाठणारे सोने मुंबईत सोमवारी त्यापुढेच राहिले. तोळ्यामागे ४० रुपयांची वाढ नोंदवित स्टॅण्डर्ड प्रकारच्या सोने धातूने सोमवारी दिवसअखेर ३१ हजारांपुढील, ३१,३६५ रुपये भाव मिळविला. तर चांदीच्या दरातही ३०० रुपयांची वाढ नोंदली गेली. पांढरा धातूदेखील शनिवारीच किलोसाठी ५१ हजार रुपयांचा आकडा पार करता झाला होता. त्यातुलनेत ते सोमवारी ५१,५०० रुपयांच्या पुढे ५१,७८५ रुपयांपर्यंत गेले. डॉलरच्या पुढे कंबरडे मोडलेल्या रुपयामुळे मौल्यवान धातू गेल्या सात महिन्याच्या उच्चांकी टप्प्यावर आहे. स्थानिक चलनाने सोमवारी ६३ चा तळ गाठताना नवा नीचांक नोंदविला आहे. त्यामुळे सोने तसेच चांदीच्या सोमवारच्या दराने जानेवारीच्या सुरुवातीचा टप्पा आता गाठला आहे. देशाबाहेरील धातूंच्या दरांची स्थितीदेखील भिन्न नाही. भक्कम अर्थव्यवस्थेचे संकेत मिळत असलेल्या अमेरिकेमुळे मुख्यत: लंडनसारख्या सोने बाजारात सोने गेल्या दोन महिन्याच्या उच्चांकी दरांवर पोहोचले आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा