विश्लेषकांच्या निराशाजनक कयासांचा धुव्वा उडवत चालू तिमाहीच्या सरस वित्तीय निकालांची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या इन्फोसिसने एकूणच भांडवली बाजारात उत्साहाची बरसात केली आहे.  परिणामी बाजाराला सहा आठवडय़ाच्या वरच्या टप्प्यावर नेऊन ठेवले आहे. इन्फोसिसच्या ११ टक्के समभाग मूल्यवाढीसह सेन्सेक्सही शुक्रवारी १.४४ टक्क्यांनी झेपावला. मुंबई निर्देशांक आता २० हजाराच्या काठावर असून, राष्ट्रीय शेअर बाजारानेही दीड महिन्यानंतर प्रथमच ६ हजाराच्या टप्प्याला गाठले आहे.
सप्ताहाच्या अखेरच्या दिवशी २८२.४१ अंश वाढीसह सेन्सेक्स १९,९५८.४७ वर तर निफ्टी ७३.९० अंश वधारणेसह ६,००९ वर बंद झाला. इन्फोसिसच्या जोरावरच सेन्सेक्सने गुरुवारीदेखील २ टक्क्यांची उसळी घेतली होती.
भांडवली बाजाराचे व्यवहार सुरू होण्यापूर्वीच इन्फोसिस या देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या माहिती तंत्रज्ञान कंपनीचे तिमाही वित्तीय निष्कर्ष जाहीर झाले. ते यापूर्वी व्यक्त केलेल्या अंदाजापेक्षा खूपच सकारात्मक राहिल्याने एकूण आयटी निर्देशांकासह सेन्सेक्सही वधारला. बाजाराची सुरुवातच २०० अंशांच्या तेजीने झाली. बाजाराचा तेजीचा प्रवास दिवसभर कायम राहिला. मुंबई निर्देशांकाची पातळी या दरम्यान १९,९९१.९४ (उच्चांक) ते १९,७८५.५९ नांचांकादरम्यान राहिली. दिवसअखेर सेन्सेक्स बंद झाला तेव्हा तो ३० मेनंतरच्या वरच्या टप्प्यावर स्थिरावला.
सेन्सेक्समधील शुक्रवारच्या २८२ अंकांच्या तेजीत केवळ इन्फोसिसचे योगदान हे १५७.४५ अंकांचे आहे. त्याचबरोबर अनुक्रमे २.९४ व ३.३४ टक्क्यांनी टीसीएस, विप्रोचे यात महत्त्वाचे योगदान राहिले. एकूण माहिती तंत्रज्ञान निर्देशाक ६.४६ टक्के वाढीसह क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये आघाडीवर राहिला. या शिवाय सेन्सेक्सच्या एकूण उभारीत रिलायन्स, एचडीएफसी बँक, लार्सन अ‍ॅन्ड टुब्रो, टाटा मोटर्स, डॉ. रेड्डीज् लॅब, भारती एअरटेल यांचाही सहभाग राहिला. सेन्सेक्समधील २२ समभागांचे मूल्य वधारले.
शुक्रवारी उशिरा म्हणजे बाजारातील व्यवहार आटोपल्यावर जाहीर झालेले औद्योगिक उत्पादन दर, घाऊक किंमत निर्देशांक तसेच काही बँकांचे स्पष्ट होणारे वित्तीय निष्कर्ष, चीनचा दुसऱ्या तिमाहीतील सकल राष्ट्रीय उत्पादन दर अशा घडामोडींवर भांडवली बाजाराचा आगामी प्रवास असेल, असे कोटक सिक्युरिटीजचे संजीव झारबडे यांनी म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा