ऐन दिवाळीची सुरुवात मोठय़ा तेजीसह करणारा मुंबई शेअर बाजार सलग तिसऱ्या सत्रातील निर्देशांक वधारल्यामुळे सप्ताह उंचीवर विराजमान झाला आहे. १४५.८० अंश वाढीमुळे सेन्सेक्स मंगळवारी २६,५०० च्या पुढे जात २६,५७५.६५ वर पोहोचला. तर ४८.३५ अंश वधारल्यामुळे निफ्टी पुन्हा एकदा ७,९०० च्या पल्याड गेला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा हा प्रमुख निर्देशांक मंगळवार अखेर ७,९२७.७५ पर्यंत पोहोचला.
सोमवारच्या शेअर बाजार तेजीला केंद्र सरकारच्या इंधन दर नियंत्रणमुक्तनिर्णयाचे निमित्त मिळाले. तर मंगळवारची निर्देशांक झेपेलाही कोळसा खाणींच्या इ-लिलाव आणि वाणिज्यीकरणाचे कारण लाभले. नव्या संवत्सरापूर्वी भांडवली बाजाराच्या निर्देशांकाचा फटका अधिक मोठय़ाने फुटण्यासाठी अर्थगतीसाठी आवश्यक निर्णयांची बारुद कारणीभूत ठरत आहे. बाजारात मुहूर्ताचे सौदे येत्या गुरुवारी होत आहेत.
सलगच्या गेल्या तीन व्यवहारांत सेन्सेक्स तब्बल ५७६ अंशांनी झेपावला आहे. सोमवारी दिवाळीच्या पहिल्याच दिवशी नव्या सप्ताहाची सुरुवात सेन्सेक्सने एकाच व्यवहारात तब्बल ३२१ अंश वाढ अशा जवळपास १० दिवसांतील सर्वोत्तम झेप राखली होती. तर मंगळवारच्या जवळपास दीड शतकी निर्देशांक वाढीमुळे सेन्सेक्स ९ ऑक्टोबरच्या २६,६३७.२८ या टप्प्यानजीक गेला.
सेन्सेक्समधील २२ कंपनी समभागांचे मूल्य वधारले. तर कोल इंडिया, ओएनजीसी, रिलायन्स, इन्फोसिससह ८ समभाग घसरले. क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये स्थावर मालमत्ता निर्देशांक सर्वाधिक २.६३ टक्क्य़ांनी वधारला. तर पोलाद, ऊर्जा, भांडवली वस्तू तसेच ग्राहकपयोगी वस्तू निर्देशांकानेही तेजीला साथ दिली. व्यवहारात सेन्सेक्स २६,६१५.४१ पर्यंत गेला. तर सोमवारी विदेशी गुंतवणूकदारांनी १,०४०.०८ कोटी रुपये बाजारात ओतले होते.
एफटीआयएल समभाग २० टक्क्य़ांनी कोसळला
घोटाळेग्रस्त एनएसईएलचे फायनान्शिअल टेक्नॉलॉजिजमध्ये (एफटीआयएल) विलीनीकरण करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाने हा समभाग मुंबई शेअर बाजारात एकदम २० टक्क्य़ांनी आपटला. या तीव्र घडामोडीमुळे एफटीआयएलचे बाजार मूल्यही एकदम २०० कोटी रुपयांनी खालावले. बीएसईवर कंपनीच्या समभागाचे मूल्य १६९.६५ रुपयांवर आले. सत्राच्या सुरुवातीला समभाग वधारणेत होता. मात्र सरकारचा निर्णय जाहीर झाला आणि समभागाने नांगी टाकली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा