अमेरिकी, चीनसारख्या आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वस्त व्याजदराच्या दिशेने पडलेले पाऊल भारतातही रिझव्र्ह बँकेच्या रुपात उमटेल या आशेवर सप्ताहारंभी गुंतवणूकदारांनी भांडवली बाजाराच्या प्रमुख निर्देशांकाला त्यांच्या अनोख्या टप्प्यावर नेऊन ठेवले. यामुळे तब्बल ४०० अंश वाढीसह सेन्सेक्स २७,५०० च्या पुढे गेला; तर निफ्टी शतकाहून अधिक अंश वाढीमुळे ८,३०० च्या पुढे राहिला.
एप्रिलमधील महागाई दर व मार्चमधील औद्योगिक उत्पादनाचा दर मंगळवारी जाहीर होत असतानाच त्याबाबतही समाधानाची आशा बाजारात व्यक्त करण्यात आली. तर सोमवारीच भांडवली नफ्यावरील करमागणी तूर्त थांबविण्याबाबतचे सरकारचे स्पष्ट संकेत विदशी गुंतवणूकदारांना बाजारात पुन्हा निधी ओतण्यास कारणीभूत ठरला.
४०१.९१ अंश वाढीसह सेन्सेक्स २७,५०७.३० वर बंद झाला. सत्रात तो २७,५४४.२४ पर्यंत झेपावला होता. त्याचा बंद हा यापूर्वीच्या २३ एप्रिलच्या २७,७३५.०२ नजीक होता. तर व्यवहारात ८,३३२.७५ पर्यंत पोहोचणारा राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी दिवसअखेर १३३.७५ अंश वाढीसह ८,३२५.२५ वर बंद झाला. निफ्टीने यापूर्वी गेल्या सप्ताहात हा क्रम राखला होता.
किमान पर्यायी कर (मॅट) बाबत उच्च स्तरिय समिती नेमण्याच्या संकेताना गेल्या सप्ताहाची अखेरही सेन्सेक्सने तब्बल ५०६ अंश वाढ नोंदवत केली होती. रिझव्र्ह बँकेचे आगामी पतधोरण येत्या महिन्यात येऊ घातले आहे. त्यात यंदा व्याजदर कपातीची आशा गुंतवणूकदारांना आहे.
मुंबई शेअर बाजारात व्याजदराशी निगडित बँक, वाहन क्षेत्रातील समभागांना मागणी राहिली. सेन्सेक्समधील ३० पैकी तब्बल २६ समभागांचे मूल्य उंचावले. त्यातही स्टेट बँक ५.४४ टक्के वाढीसह सर्वात आघाडीवर राहिला. पाठोपाठ वेदांता, हीरो मोटोकॉर्प, एचडीएफसी यांच्यातही ५.३४ टक्क्य़ांपर्यंतची वाढ नोंदली गेली. वधारलेल्या अन्य समभागांमध्ये सेन्सेक्समधील आयसीआयसीआय बँक, टाटा मोटर्स, इन्फोसिस, सन फार्मा, टीसीएस, अॅक्सिस बँक यांचा समावेश होता. क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये २.६५ टक्क्य़ांसह पोलाद निर्देशांक अधिक चमकला. १२ पैकी ११ क्षेत्रीय निर्देशांक २.५२ टक्क्य़ांपर्यंत वाढले होते. मिड व स्मॉल कॅपही अनुक्रमे २.१३ व १.२८ टक्क्य़ांनी झेपावले.
रुपयाची सलग दुसरी वाढ
डॉलरच्या तुलनेत रुपया सोमवारी सलग दुसऱ्या व्यवहारात भक्कम बनला. ९ पैशांनी उंचावत स्थानिक चलन सप्ताहारंभी ६३.८५ वर पोहोचले.
व्याजदर कपातीच्या दिशेने तेजीचे वारे
अमेरिकी, चीनसारख्या आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वस्त व्याजदराच्या दिशेने पडलेले पाऊल भारतातही रिझव्र्ह बँकेच्या रुपात उमटेल
First published on: 12-05-2015 at 07:44 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nifty holds 8300 sensex strong midcap gains 2 percent fmcg weak