सरलेल्या वर्षांत ९ डिसेंबरला ‘निफ्टी’ निर्देशांकाने ६४१५ असा सार्वकालिक उच्चांक दाखविला. त्यानंतर मात्र एका निमुळत्या आवर्तनात निर्देशांकाचे हेलकावे सुरू आहेत. नव्या शिखराला गाठता येईल अशा सबळ कारणाच्या (ट्रिगर) प्रतीक्षेत निर्देशांक असल्याचे दिसून येते. परंतु २०१४ सालच्या पूर्वार्धातच ‘निफ्टी’चे नवे शिखर दिसेल अशी पुरेपूर शक्यता आढळून येते. ‘निफ्टी’कडून ६५३७ अंशाचा टप्पा सर केला जाईल आणि त्यापुढे ६८०० पल्याडही ती मजल मारू शकेल, असे जिओजित बीएनपी परिबा फायनान्शियल सव्र्हिसेसचे संशोधन प्रमुख अॅलेक्स मॅथ्यूज् यांचा कयास आहे.
*‘निफ्टी’च्या मुसंडीची कारणे काय?
*महागाई : गेले काही महिने डोकेदुखी बनलेली अन्नधान्यातील महागाई उतरणीला लागल्याचे सुचिन्हे दिसत आहेत. जर या प्रकारची महागाई काबूत आली तर रिझव्र्ह बँक व्याजाचे दर खाली आणेल. जी अर्थातच चढय़ा दरामुळे कर्जे महाग झालेल्या कंपन्यांसाठी उत्साहदायी बाब असेल.
*व्यावसायिक फेररचना : गेल्या दोन-अडीच वर्षांतील आर्थिक मलूलतेने आपल्या कंपन्यांना काही उत्तम धडेही दिले आहेत. बहुतांश भारतीय कंपन्या ज्यांच्यावर मोठे कर्जदायित्व आहे, त्यांनी हा बोजा कमी करण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न सुरू केले आहेत. व्यवसायाची फेररचना, स्थायी व हृदयस्थानी नसलेल्या पण तोटय़ात गेलेल्या व्यवसायांपासून हात मोकळे करणे, अन्य अल्पमहत्त्वाच्या मालमत्तांची विक्री असे मार्ग त्यासाठी अनुसरले गेले आहेत. या फेरबदलांचे सुपरिणाम हे आगामी आर्थिक वर्षांत म्हणजे एप्रिल २०१४ पासून दिसून येतील.
गुंतवणूक-नीती काय असावी?
*सॉफ्टवेअर सेवा क्षेत्रातील एचसीएल टेक, टीसीएस, टेक महिंद्र हे यापुढेही गुंतवणूकदारांच्या पदरात चांगला लाभ पाडतील.
*व्याजाचे दर सध्याच्या पातळीवरून खाली आले तर, वास्तविक मूल्यापेक्षा खूपच स्वस्त बनलेल्या बँकिंग समभागांमध्ये खरेदीला ऊत येईल. अॅक्सिस बँक, आयसीआयसीआय आणि एचडीएफसी बँक म्हणूनच मध्यम कालावधीसाठी पोर्टफोलियोमध्ये असावेत.
*महिंद्र अॅण्ड महिंद्र, ल्युपिन, लार्सन अॅण्ड टुब्रो आणि रिलायन्स इंडस्ट्रीज तेजीच्या बाजारातील दमदार खेळाडूंपैकी कुणीतरी सोबतीला असायलाच हवा.
*निवडणुका : आगामी सार्वत्रिक निवडणुका शेअर बाजार व अर्थव्यवस्थेसाठी प्रतिकूल ठरण्यापेक्षा उपकारकच ठरतील. निवडणुकांमध्ये एक पक्ष अथवा आघाडीला पूर्ण बहुमत मिळाले तर ते सोन्याहून पिवळे ठरेल. केंद्रातील सशक्त सरकार मग ते कुणाचेही का असेना, अर्थकारणासाठी अनुकूल बाबच ठरावी. विद्यमान सरकारने अंतिम टप्प्यात थेट विदेशी गुंतवणूक धोरणाविषयी दाखविलेला ध्यास हा नव्या येणाऱ्या कोणत्याही सरकारला पुढे रेटावाच लागेल. कारण विविध क्षेत्रांत नवनवीन गुंतवणूकदार आकर्षिले जावेत आणि त्यायोगे सध्या समस्या बनलेली चालू खात्यातील तूट (कॅड) नियंत्रणात आणण्याचा हाच एकमेव उपाय दिसून येतो. शिवाय उर्वरित तीन महिन्यांत सरकारने खोळंबलेले पायाभूत प्रकल्प मार्गी लावण्याचा सपाटा सुरू केल्यास, देशाच्या विकासदराच्या दृष्टीने ही बाब पूरक ठरेल.
*अमेरिकी अर्थसुधार : अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेची ताजी कामगिरीदेखील आपले आत्मबल उंचावणारी ठरत आहे. विशेषत: निर्यातीसाठी बहुतांश अमेरिकेवर मदार असलेल्या आयटी कंपन्यांच्या दृष्टीने ही चांगली बाब ठरेल. अमेरिकेची मध्यवर्ती बँक – फेडरल रिझव्र्हने जरी जानेवारीपासून आर्थिक प्रोत्साहनपर दरमहा रोखे खरेदीत १० अब्ज डॉलरने कपात केली असली तरी यातून विदेशी वित्तसंस्थांची भारतीय समभागांमधील रुची ढळल्याचे कुठल्याही कोनातून दिसून येत नाही. तर अमेरिकेतील ताजे रोजगारविषयक आकडे अजूनही चिंता पुरती सरली नसल्याचे दाखवून देतात. त्यामुळे यापुढे द्रवतापूरक आर्थिक उत्तेजकांमध्ये आणखी कपात संभवत नाही, असेच संकेत असून, जे आपल्या रोखे व समभाग बाजारासाठी अनुकूल बाबच ठरली आहे.
तरी गुंतवणूक पर्याय म्हणून सोने आकर्षक!
अॅलेक्स मॅथ्यूज्
जिओजित बीएनपी परिबा फायनान्शियल सव्र्हिसेस
*गुंतवणूक भागभांडाराचा काही हिस्सा हा सोने आणि चलन (अमेरिकी डॉलर) या दोहोंनी युक्त असावा असाही एक कल आहे. विशेषत: सोन्याच्या भावाने अलीकडच्या काळात दाखविलेल्या कोलांटउडय़ा अल्पमुदतीच्या ट्रेडर्स/ गुंतवणूकदारांसाठी लाभकारक निश्चितच ठरल्या आहेत. सोन्याच्या आंतरराष्ट्रीय भावात आणखी घसरणीला वाव बराच कमी आहे. प्रति औंस (१ औंस = २८.३५ ग्रॅम) ११८२ डॉलर ते खाली ११२५ डॉलर ही सोने भावाची काही काळ पातळी राहील. सोन्यातील गुंतवणूक पूर्णपणे टाळण्यापेक्षा भावातील कोणतीही घसरण ही खरेदीची संधी म्हणून पाहिली जायला हवी. सोन्याने आपली रया गमावली आहे, मागणी ओसरली आहे, असे आढळून येत नाही, भारतासह चीनमध्ये मागणीतील वाढ पाहता पुढची काही वर्षे तरी सोन्याची झळाळी कमी होईल असे दिसून येत नाही. आपल्या अर्थव्यवस्थेवर बोजा बनलेल्या चालू खात्यावरील तूट नियंत्रणात आल्यास सरकारही सोन्याच्या आयात शुल्कात कपातीचे पाऊल टाकू शकेल. सोन्याने गमावलेले वैभव मिळवून देण्यास ही बाब उपयुक्त ठरेल.
६८०० पल्याड मजल मारण्याचे ‘निफ्टी’त सामथ्र्य!
सरलेल्या वर्षांत ९ डिसेंबरला 'निफ्टी' निर्देशांकाने ६४१५ असा सार्वकालिक उच्चांक दाखविला. त्यानंतर मात्र एका निमुळत्या आवर्तनात निर्देशांकाचे हेलकावे सुरू आहेत. नव्या शिखराला गाठता येईल अशा सबळ कारणाच्या (ट्रिगर) प्रतीक्षेत निर्देशांक असल्याचे दिसून येते. परंतु २०१४ सालच्या पूर्वार्धातच 'निफ्टी'चे नवे शिखर …
First published on: 23-01-2014 at 06:31 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nifty seen at 6800 levels