निफ्टीसह सेन्सेक्स तीन सप्ताहांच्या तळात
भांडवली बाजाराने नव्या सप्ताहारंभी पुन्हा एकदा कंपन्यांच्या तिमाहीत वित्तीय निष्कर्षांबाबत चिंता वाहिली. सोमवारी सेन्सेक्स १६९.६५ अंश घसरणीसह २५,४३६.९७ पर्यंत खाली आला. तर ४३.९० अंश घसरणीमुळे निफ्टा ७,८०५.९० वर स्थिरावला.
गेल्या सप्ताहाच्या अखेरच्या टप्प्यात आयसीआयसीआय बँकेने दशकातील सुमार तिमाही निकाल नोंदवित बँकसह एकूणच कंपनी क्षेत्रात अस्वस्थता निर्माण केली होती. बँकेचा समभाग सलग दुसऱ्या दिवशीही ४ टक्क्य़ांहून अधिक प्रमाणात आपटला. यशस्वी तिमाही निकाल जाहीर करणाऱ्या एचडीएफसी लिमिटेडचा समभागही सोमवारी काही प्रमाणात वधारला. सेन्सेक्समध्ये मारुती सुझुकी, इंडिगो, भेल, हीरो मोटोकॉर्प हेही वाढते राहिले.
मुंबई निर्देशांकातील १८ समभागांचे मूल्य घसरले. त्यात अदानी पोर्ट्स, भारती एअरटेल, स्टेट बँक, एचडीएफसी बँक, टाटा स्टील, विप्रो, इन्फोसिस यांचा क्रम राहिला.
सेन्सेक्स आता त्याच्या १२ एप्रिलनंतरच्या स्तरावर आला आहे. निफ्टीने व्यवहारात ७,८०० चा स्तरही सोडला होता. दिवसअखेर त्याने तो पुन्हा मिळविला. तर सेन्सेक्सचा सत्रातील वरचा प्रवास २५,५०० च्या आतच राहिला.
क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये बँक, माहिती तंत्रज्ञान यातील समभागांना घसरणीचा सामना करावा लागला. प्रमुख निर्देशांक घसरले असले तरी मुंबई शेअर बाजारातील मिड व स्मॉल कॅप निर्देशांक मात्र उंचावले होते. आंतरराष्ट्रीय बाजारातही सोमवारी पडझट नोंदली गेली. एप्रिलमधील घसरत्या निर्मिती उत्पादनाचे सावटही बाजारावर उमटले. त्याचबरोबर घसरता रुपया आणि पुन्हा वाढत जाणारे खनिज तेल यावरही बाजाराने नकारात्मक व्यवहाराद्वारे प्रतिक्रिया नोंदविली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा