आंतरराष्ट्रीय बाजारांप्रमाणेच भारतीय भांडवली बाजारातील घसरण बुधवारीही सलग राहिली आहे. नव्या वर्षांच्या तिसऱ्या सत्रातही घसरण नोंदविताना मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स बुधवारी २५,५०० च्याही खाली उतरला. १७४.०१ अंश घसरणीमुळे २५,४०६.३३ हा त्याने १५ डिसेंबरनंतरचा तळ राखला. तर ४३.६५ अंश घसरणीने राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक ७,७५० ची स्तर सोडत ७,७४१ वर येऊन ठेपला.
प्रमुख निर्देशांक घसरणीला बुधवारी उत्तर कोरियाने केलेल्या हायड्रोजन बॉम्ब चाचणीचे निमित्त मिळाले. यापूर्वी बाजाराने चीन व अमेरिकेतील घडामोडींवर नकारात्मक प्रवास नोंदविला आहे. डिसेंबरमध्ये गेल्या १० महिन्यांतील सर्वोत्तम सेवा क्षेत्राचा दर राखणाऱ्या अर्थआशावादी वृत्ताचाही बाजारावर परिणाम झाला नाही. बुधवारच्या व्यवहाराची तेजीसह सुरुवात करणारा सेन्सेक्स सत्रात २५,३५७.७० पर्यंत घसरला.
सेन्सेक्समधील आयटीसी, आयसीआयसीआय बँक, टाटा मोटर्स, महिंद्र अ‍ॅण्ड महिंद्र, मारुती सुझुकी, अदानी पोर्ट्स, एशियन पेंट्स, ओएनजीसी, हिरो मोटोकॉर्प, ल्युपिन, एल अ‍ॅण्ड टी, सन फार्मा, अ‍ॅक्सिस बँक, हिंदुस्थान यूनिलिव्हर यांचे समभाग मूल्य घसरले.
तर पोलाद, भांडवली वस्तू, वाहन, स्थावर मालमत्ता, बँक निर्देशांकांमध्येही घसरण नोंदली गेली.

आंतरराष्ट्रीय बाजारात पडझड कायम
जागतिक बाजारातही आशियासह युरोपातील प्रमुख बाजारांचे निर्देशांक घसरते राहिले. उत्तर कोरियाच्या बॉम्ब चाचणीमुळे जपानचा निक्केई (-१%), दक्षिण कोरियाचा कोस्पी (-०.३%), हाँगकाँगचा हँगसेंग (-१%) बुधवारी घसरले. तर फ्रान्सचा कॅक४० (-०.६%), जर्मनीचा डॅक्स (-०.६%), ब्रिटनचा एफटीएसई१०० (-०.७%) मध्ये तसेच अमेरिकेच्या डाऊ जोन्स, एस अ‍ॅन्ड पी५०० निर्देशांकातही सुरुवातीच्या व्यवहारात घसरण दिसून आली.

Story img Loader