बाजाराच्या निरनिराळ्या काळात वेगवेगळ्या तऱ्हा असतात. सरलेला आठवडा हा मंदीकडे झुकलेला व चढ-उतारांचा राहील, असे नमूद करून खरेदी न करण्याचा वाचकांना सल्ला देण्यात आला होता. आठवडय़ाअखेरीस शुक्रवारी निर्देशांकाचा स्तर पाहता हा आठवडा फारसा चांगला राहिला नाही, हे स्पष्टच होते. पण हा असा नरम बाजारही अनेकांसाठी लाभदायक ठरतोच. बुधवार ते शुक्रवार बाजारातील आकस्मिक चढ-उतारांच्या लाटा या इंट्रा-डे म्हणजे सकाळी खरेदी त्याच दिवशी विक्री करणाऱ्या ट्रेडर्ससाठी खासच फायद्याच्या ठरल्या असतील.
कंपन्यांच्या तिमाही निकालांचा हंगाम संपत आला आहे. रिझव्र्ह बँकेचे पतधोरणही सरून गेले. आता काही आठवडे तरी निफ्टीची ६,०००ची पातळी हाच काय तो उत्सुकतेचा मुद्दा असेल. सरलेल्या आठवडय़ात निफ्टीने कशीबशी ही मानसिकदृष्टय़ा जिव्हाळ्याची पातळी सांभाळली. दिग्गजांचे तांत्रिक संकेत हे ५७५० पातळीकडे आहेत.
डिसेंबर २०१३ तिमाहीअखेरच्या बऱ्या-वाईट निकालांचे अवलोकन करताना, आपण बडय़ा कंपन्यांऐवजी मिड-कॅप कंपन्यांच्या कामगिरीकडे आस्थेने पाहणे स्वाभाविकच आहे. पण दुर्दैवाने बीएसई मिड-कॅप निर्देशांकात समाविष्ट एक-तृतीयांश कंपन्यांची नफाक्षमता ही गेल्या वर्षांच्या डिसेंबर तिमाहीच्या तुलनेत घटली आहे.
तरी बाजारात मिड-कॅप, स्मॉल-कॅपने पुन्हा खरेदीसाठी लक्ष वेधलेले दिसून येते. अनेक विदेशी वित्तसंस्थाही (एफआयआय) या समभागांमध्ये निवडक स्वरूपात खरेदी करीत आहेत. ही एक आश्वासकच बाब ठरते. डिसेंबरमध्ये खरेदीची संधी हुकलेल्या एफआयआयना फेब्रुवारी प्रवेशाचा मोका निश्चितच मिळेल. विशेषत: ग्राहकोपयोगी उत्पादन क्षेत्रातील समभागांमध्ये देशी-विदेशी फंडांकडून खरेदीचे स्वारस्य दिसून येत आहे. या उद्योग क्षेत्रातील बरेच समभाग वाढायला लागले आहेत. २०१२च्या तुलनेत सरलेल्या २०१३ मध्ये एलआयसीसह विमा कंपन्यांची बाजारात खरेदीपेक्षा विक्रीची मात्र जास्त राहिली आहे. अर्थात यातून त्यांनी फायदाही कमावलाच असेल. सर्वात बडय़ा एलआयसीने बीएसईवरील १०० कंपन्यांपैकी ४३ कंपन्यांमध्ये सरलेल्या २०१३ सालात आपला हिस्सा घटविला आहे. यात तिने खूपच चांगला नफाही कमावल्याचे आढळून आले आहे.

बाजारगप्पा..
*चालू वर्षअखेर डिसेंबपर्यंत निर्देशांक कोणत्या पातळीवर असेल याबद्दल तर्क-वितर्क जोराशोराने सुरू आहेत. सेन्सेक्सच्या २४ हजाराचा स्तर अशा पूर्वी केलेल्या भाकीतावर विदेशी वित्तसंस्था ठाम आहेत. फेब्रुवारीतील मंदीच्या कलानेही या भाकीतांवर परिणाम केलेला नसला तरी याच संस्थांमध्ये कुजबूज अशीही की, ऑगस्ट २०१३ मध्ये सेन्सेक्सने दाखविलेला स्तरही फार दूर नाही. आपण मात्र बोध घ्यायचा तो हाच की यांचे खायचे दात व दाखवायचे दात वेगळे आहेत.
शिफारस
*येता आठवडाही हा मंदीसह वादळी-वधघटीचाच राहील. अशा बाजारात अल्पकालीन उद्देशाने प्रवेश करणे सट्टा खेळण्यासारखेच ठरेल. जोखीम खूप मोठी आहे. त्यामुळे या आठवडय़ात खरेदीला पुन्हा विराम.