केंद्र सरकारने विमा व्यवसायचे नियंत्रण करणाऱ्या भारतीय विमा नियमन व विकास प्राधिकरणावर (आयआरडीए) दोन नवीन सदस्यांच्या नेमणुका केल्या आहेत. भारतीय आयुर्वमिा मंडळाचे कार्यकारी संचालक व सध्या एलआयसी नोमुरा म्युच्युअल फंडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी असलेले नीलेश साठे व मागील महिन्यात बँक ऑफ इंडियाच्या अध्यक्षा व व्यवस्थापकीय संचालिका या पदावरून सेवानिवृत्त झालेल्या विजयालक्ष्मी अय्यर यांची नेमणूक करण्यात आली आहे.
‘आयआरडीए’वर नीलेश साठे यांची सदस्य (आयुर्विमा) तर विजयालक्ष्मी अय्यर यांची सदस्य (वित्त) म्हणून नेमणूक झाली आहे. प्राधिकरणाने एकूण तीन जागा भरण्यासाठी जाहिरात दिली होती. या जाहिरातीला प्रतिसाद दिलेल्यांपकी निवडक उमेदवारांना मुलाखतीसाठी पात्र ठरविण्यात आले होते. त्यानुसार मार्च महिन्यात मुलाखती झाल्या होत्या. प्राधिकरणाच्या सदस्य (सामान्य विमा) या पदासाठी मुलाखती मे महिन्यात झाल्या असून या मुलाखत प्रक्रियेचा निकाल अद्याप जाहीर झालेला नाही.
नीलेश साठे यांची एलआयसी नोमुराच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती होण्याआधी ते एलआयसीच्या उत्तर विभागाचे प्रमुख होते. नागपूर विद्यापीठातून वाणिज्य विषयात पदव्युत्तर पदवी त्यांनी संपादन केली असून ते १९७७ मध्ये थेट भरतीद्वारे अधिकारी म्हणून दाखल झाले. कार्यकारी संचालक होण्याआधी एलआयसीच्या मुंबई-१ व मुंबई-४ या दोन्ही विभागांचे व्यवस्थापक म्हणून त्यांनी जबाबदारी पार पाडली आहे.
विजयालक्ष्मी अय्यर या ५ नोव्हेंबर २०१२ ते ३० मे २०१५ या दरम्यान बँक ऑफ इंडियाच्या अध्यक्षा व व्यवस्थापकीय संचालिका म्हणून कार्यरत होत्या. त्याआधी त्या सेन्ट्रल बँकेच्या कार्यकारी संचालिका होत्या. अय्यर यांनी मंगळवारी आयआरडीएच्या मुख्यालयात नव्या पदाचा कार्यभार स्वीकारला, तर नीलेश साठे हे १ जुल रोजी नवीन पदी रुजू होणार आहेत.