म्युच्युअल फंड उद्योगातील सर्वात मोठी विदेशी गुंतवणूक
भारतीय म्युच्युअल फंड क्षेत्रात सर्वात मोठी विदेशी गुंतवणूक करताना जपानच्या निप्पॉन लाइफने अनिल अंबानी यांच्या रिलायलन्स कॅपिटल अ‍ॅसेट मॅनेजमेंट कंपनीतील आपला हिस्सा जवळपास निम्म्यावर नेला आहे. निप्पॉन लाइफने रिलायन्सच्या या फंड व्यवस्थापन कंपनीतील अतिरिक्त १४ टक्के हिस्सा १,१९६ कोटी रुपयांना खरेदी केला आहे. यामुळे कंपनीतील निप्पॉन समूहाची भागीदारी आता ४९ टक्क्यांपर्यंत गेली आहे.
निप्पॉन लाइफच्या नव्या हिस्सावाढीनंतर फंड कंपनीचे नवे नाव रिलायन्स निप्पॉन लाइफ असेट मॅनेजमेंट कंपनी असे झाले आहे. या व्यवहारास उभय कंपन्यांच्या संचालक मंडळाने मंजुरी दिली आहे. भारतीय फंड क्षेत्रातून गेल्या काही महिन्यांमध्ये विदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय लक्षात घेता रिलायन्स-निप्पॉनच्या वाढत्या भागीदारी व्यवसायामार्फत पुन्हा एकदा फंड व्यवसायाला गती मिळण्याची चिन्हे आहेत. भारतीय फंड कंपन्यांचे निधी व्यवस्थापन सप्टेंबरअखेर १३ लाख कोटी रुपयांच्या वर गेले आहे.
२०१२ मध्ये निप्पॉन लाइफने रिलायन्स- अनिल धीरुभाई अंबानी समूहातील (आर-एडीएजी) रिलायन्स कॅपिटल असेट मॅनेजमेंट कंपनीत २६ टक्के हिस्सा १,४५० कोटी रुपयांना खरेदी करीत भारतीय फंड उद्योग खासगी क्षेत्राला खुला होतेसमयी शिरकाव केला होता. यानंतर गेल्या आर्थिक वर्षांच्या अखेरच्या टप्प्यात, फेब्रुवारी २०१५ मध्ये अतिरिक्त ९ टक्के हिस्सा ६५७ कोटी रुपयांना खरेदी केला. तर आता आणखी १४ टक्के हिस्सा घेत निप्पॉन लाइफने रिलायन्सच्या फंड कंपनीतील एकूण हिस्सा ३५ टक्क्यांवरून ४९ टक्क्यांवर नेला आहे. अतिरिक्त भागीदारीकरिता निप्पॉनने यंदा १,९९६ कोटी रुपये मोजले आहेत.
रिलायन्स कॅपिटल या वित्त व्यवसायाच्या देखरेखीखाली असलेल्या रिलायन्स कॅपिटलचे ३० जून २०१५ अखेर निधी व्यवस्थापन २,४३,१६२ कोटी रुपये राहिले आहे, तर निप्पॉन लाइफ ही जपानमधील खासगी क्षेत्रातील आघाडीची विमा कंपनी असून तिच्या एक कोटी योजनांची विक्री झाली आहे. दरम्यान, भागीदारीवाढीच्या वृत्तानंतर मुंबई शेअर बाजारात रिलायन्स कॅपिटलचे समभाग मूल्य ५.१० टक्क्यांनी वाढून ३९८.८० रुपये झाले. सत्रात समभाग सोमवारच्या तुलनेत ६.२८ टक्क्यांपर्यंत उंचावला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा