जागतिक दर्जाची क्रीडाविषयक पायाभूत सुविधेने सुसज्ज मुंबईतील पहिले निवासी संकुल मुलुंडनजीक साकारली जात आहे. शहरातील आधुनिक गतिमान जीवनशैलीला साजेशा गृहनिर्माणात अग्रेसर असलेल्या निर्मलने या ‘स्पोर्ट सिटी’ची उभारणी केली आहे.
पूर्व द्रुतगती महामार्ग आणि एलबीएस रोड या दोन्हीपासून नजीक तसेच ठाणे आणि मुलुंड रेल्वेस्थानकाच्या मधोमध साकारल्या गेलेल्या या स्पोर्टसिटीचे वैशिष्टय़ म्हणजे तेथे यूएस ओपन (टेनिस), फिना आणि आयआयएएफ (अ‍ॅथलेटिक्स) या जागतिक क्रीडा संघटनांनी घालून दिलेल्या मानदंडानुसार आऊटडोअर आणि इनडोअर क्रीडा सुविधा विकसित केल्या गेल्या आहेत. गुणात्मक राहणीमानात तब्येत, व्यायाम आणि खेळालाही समर्पक महत्त्व मिळायला हवे, या उद्देशानेच या गृहसंकुलाची निर्मिती केली गेली आहे, असे निर्मलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक धर्मेश जैन यांनी सांगितले. येथील बाइंचुंग भूतिया फूटबॉल स्कूलमध्ये प्रमाणित क्रीड प्रशिक्षकांकडून फूटबॉलच्या र्सवकष प्रशिक्षणाचीही सोय केली गेली असल्याचे जैन यांनी सांगितले. या गृहसंकुलात केवळ या क्रीडा सुविधा एक एकरहून अधिक क्षेत्रावर फैलावल्या आहेत. शिवाय सायकलिंग ट्रॅक, स्केटिंग रिंक, रॉक क्लाइम्बिंग, बास्केट बॉल कोर्ट, बॅडमिंटन कोर्ट, शूटिंग रेंज वगैरे निवासी संकुलात असामान्य असलेल्या सुविधाही येथे सुसज्ज करण्यात आल्या आहेत.
जागतिक मराठी चेंबरचा उद्योगरत्न पुरस्कार सोहळा
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या उपस्थितीत जागतिक मराठी चेंबर ऑफ कॉमर्सच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित उद्योगरत्न पुरस्कार सोहळ्यात किशोर अवर्सेकर, विठ्ठल कामत, रवींद्र प्रभुदेसाई आणि सुनीता रामनाथकर यांना गौरविण्यात आले. याच कार्यक्रमात चेंबरचे अध्यक्ष मनोहर जोशी यांच्या हस्ते पद्मभूषण डॉ. नंदकिशोर लाड यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. उद्योग व्यवसायात पैसा कमावणे चुकीचे नाही. परंतु अहंकार न बाळगता पाय कायम जमिनीवरच राहावेत, असा सल्ला यावेळी बोलताना पर्रिकर यांनी दिला. यापुढे पुरस्कारार्थीचा निवडीचा निकष उलाढालीत १०० कोटींचा निकष वाढवून ५०० कोटींवर न्यावा. या निकषात बसणारे मराठी उद्योजक नक्कीच सापडतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. तोच धागा पकडून प्रत्येक मराठी कुटुंबात एक उद्योजक निर्माण होणे ही काळाची गरज असल्याचे मनोहर जोशी यांनी आपल्या भाषणात प्रतिपादन केले. चेंबरचे कार्याध्यक्ष शिवाजीराव आढळराव यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागतपर भाषण केले.
कौस्तुभ टूर्सच्या संचालकांना राजक्षेत्र पुरस्कार
नोकरीइच्छुकांमध्ये लोकप्रिय संकेतस्थळ ‘मी मराठी नोकरी डॉट कॉम’चा द्वितीय वर्धापनदिन आणि ‘महाराष्ट्र रोजगार डॉट कॉम’ नामांतर सोहळ्यात विविध उद्योगक्षेत्रातील नऊ होतकरू यशस्वी कामगिरी करणाऱ्या उद्योजकांना ‘राजक्षेत्र’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. या सोहळ्यात कौस्तुभ टूर्सचे संचालक समर्थ वनारसे यांनी हा पुरस्कार ब्रँडिंगतज्ज्ञ आणि आयएससीएसयूटीएलचे व्यवस्थापक प्रताप मांजरेकर यांच्या हस्ते स्वीकारला. या प्रसंगी मराठी व्यावसायिक उद्योजक व्यापारी मित्रमंडळाचे कार्याध्यक्ष अनंत भालेकर आणि ‘आम्ही उद्योगिनी प्रतिष्ठान’च्या अध्यक्षा मीनल मोहाडीकर व्यासपीठावर उपस्थित होत्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा